‘गोकुळ’ची २४ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:18+5:302021-09-09T04:30:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ...

‘गोकुळ’ची २४ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. नियमित विषयासह वाशी, नवी मुंबई व भोकरवाडा इंडस्ट्रियल एरिया, रायगड येथे जमीन खरेदी, इमारत बांधकाम व मशिनरी उभारणीसाठी येणाऱ्या भांडवली खर्चास मंजुरी देण्याबाबतचा विषय सभपुढे ठेवले आहेत.
‘गोकुळ’च्या मागील पाच-सहा सभा या वादळी झाल्या होत्या. या सभांमधील गोंधळ आणि सत्तारुढ गटाने दामटलेले विषयांचे पडसाद संघाच्या निवडणुकीत उमटले. संघात सत्तांतर झाल्यानंतरची ही पहिलीच सर्वसाधारण सभा आहे. कोरोनामुळे ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. विषय पत्रिकेवरील अकरापैकी दहा विषय हे नियमित आहेत. नवव्या क्रमांकाचा विषय वाशी, नवी मुंबई व रायगड येथील जमीन खरेदी, इमारत बांधकाम व मशिनरी उभारणीस येणाऱ्या भांडवली खर्चास मंजुरी देणे हा आहे. सत्तांतरानंतर म्हैस दूध खरेदी दरात दोन, तर गाय दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ केली आहे. त्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात विरोधकांचीच सत्ता होती, त्यात विरोधातील चारपैकी तीन संचालक यांनी हळूहळू सत्तारुढ गटासोबत जुळवून घेतले आहे. त्यामुळे या सभेत फार चर्चा होण्याची शक्यता धूसर आहे.