पदाधिकाऱ्यांच्या 'माफिनाम्या'नेच गाजली मॅरेथॉन सभा
By Admin | Updated: December 5, 2014 00:20 IST2014-12-05T00:11:03+5:302014-12-05T00:20:57+5:30
गडहिंग्लज पालिका सभा : १३४ विषयांवर ५ तास चर्चा, इतिवृत्तावरच रंगली तब्बल तीन तास सभा

पदाधिकाऱ्यांच्या 'माफिनाम्या'नेच गाजली मॅरेथॉन सभा
गडहिंग्लज : आरोप-प्रत्यारोप आणि ‘दम असेल तर व किती फाटतयं फाटू दे’ या असंसदीय शब्दांचा वापर, दिलगिरी अन् माफीनाम्यानेच नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गाजली. तब्बल सव्वा पाच तास चाललेल्या या सभेत १३४ विषयांवर वादळी चर्चा झाली. गत तीन सभांच्या इतिवृत्तांतावरही सव्वातीन तास, तर आजच्या अजेंड्यावर सव्वादोन तास गरमागरम चर्चा झाली.
२६ मेच्या सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्याचा विषय अजेंड्यावर न घेतल्याच्या कारणावरून रद्द झालेली २६ नोव्हेंबरची सभा आज, गुरुवारी झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे होत्या. सभा सचिवाला बजावलेल्या नोटिसीवरूनच वादाला तोंड फुटले. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची चूक त्यांच्या माथी का मारता, असा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. नरेंद्र भद्रापूरांचा हा मुद्दा विरोधी पक्षनेत्या स्वाती कोरींसह बसवराज खणगावेंनीही लावून धरला. मात्र, नोटीस माघारीची मागणी फेटाळली.
रस्त्यावर कचरा टाकलेल्या महिलेच्या सत्काराचा फोटो ‘व्हॉटस् अॅप’वर टाकल्यामुळे महिलांचा अपमान झाला. संबंधितांनी माफी मागावी, अशी मागणी कोरींनी केली. याबाबत उपनगराध्यक्षा कावेरी चौगुलेंनी खुलासा केला. शहरात विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे. नागरिकांना शिस्त लागावी म्हणून टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्यात कोणाला दुखावण्याचा उद्देश नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करते.
उपनगराध्यक्षांना उद्देशून बोरगावे यांनी अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी किरण कदम यांनी केली. बोरगावेंनी शब्द मागे घेऊनही सत्ताधारी कारवाईच्या मागणीवर ठाम होते. कोरींनीही माफी मागावी, अशी मंजूषा कदम यांनी केलेली मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. माफी मागणार नाही कारवाईच करा, असे बोरगावेंनी स्पष्ट केले. यावर भान ठेवून बोला, अशी ताकीद घुगरे यांनी दिली. पालिका शाळा, ट्रॅक्टर, गांडूळ खत प्रकल्प, अग्निशमन दल, यावर विशेष चर्चा झाली.(प्रतिनिधी)
एलईडी प्रस्ताव अखेर लांबणीवर
एलईडी पथदिवे बसविण्यासाठी सुमारे २ कोटीची गुंतवणूक करावी लागणार असून व्याजापोटी कोटीचा बोजा पडणार असल्याचे भद्रापूरनी निदर्शनास आणून दिले. त्यावर अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी सांगितले.
ंसत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
कामकाजाची माहिती तुम्हाला मिळते की नाही? नगरसेवकांना २४ तास लोकांना सामोरे जावे लागते. ४ तास बसलोय उत्तरे मिळत नाहीत. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळावीत, अशी मागणी सत्ताधारी नगरसेविका अरूणा शिंदे यांनी सभागृहात केली. बाकडे वाजवून विरोधकांनी त्यांच्या सूचनेचे स्वागत केले.