दिवसभर ठाण मांडलेल्या गव्याचे अखेर नैसर्गिक अधिवासाकडे मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 11:07 AM2021-12-10T11:07:55+5:302021-12-10T19:01:10+5:30

गेल्या काही दिवसापासून गव्याचा, बिबट्यांचा वावर मानवी वस्तीतील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Gaur in Panchganga Ghat area in Kolhapur | दिवसभर ठाण मांडलेल्या गव्याचे अखेर नैसर्गिक अधिवासाकडे मार्गक्रमण

दिवसभर ठाण मांडलेल्या गव्याचे अखेर नैसर्गिक अधिवासाकडे मार्गक्रमण

Next

कोल्हापूर : येथील पंचगंगा घाट जामदार क्लब परिसरात दिवसभर गव्याने ठाण मांडले होते. अखेर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गवा शिंगणापूरच्या दिशेने मूळ अधिवासाकडे निघून गेला अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पंचगंगा घाट परिसरात गवा दिसताच नागरिकांनी गव्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी व्हिडिओ करत हा गवा रेडा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला.  पंचगंगा घाट जामदार क्लब परिसरात दिवसभर गव्याने ठाण मांडले. तेथील महादेव मंदिराजवळील झुडपात त्याने विसावा घेतला. तो नागरी वसाहतीमध्ये येवू नये, यासाठी वन विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, अग्नीशमन दलाचे जवान तैनात होते. या परिसरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.

तो नागरी वस्तीकडे येवू नये, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. तो आक्रमक झाल्यास अनुचित प्रकार घडण्याचा धोका असतो. म्हणून हुसकावून मूळ अधिवासात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. केवळ त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात आली होती.

काल, गुरुवारी (दि. ९) बोंद्रेनगर - पाडळी - मार्गावरील गगनगिरी पार्कमधील सुरेश सूर्यवंशी यांच्या घराच्या कंपौंडमध्ये गवा आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. नागरिकांनी गव्याचा पाठलाग करत त्याला बालिंगेमार्गे हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गवा बालिंगे मार्गाकडे गेला. दरम्यान, कोल्हापुरातील लक्षतिर्थ वसाहतीत काल, रात्रीच्या सुमारास कुत्र्यांनी सारा परिसर भुंकुन जागा केला. लक्षतिर्थ तळ्यालगत मोहितेंचे घर व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शाळेजवळ एक मोठा गवा होता. त्याला कुत्र्यांनी पुरता घेरला होता. गवा लक्षतिर्थ वसाहतीत येऊ नये व त्याला उत्साही गर्दीचा फटका बसू नये म्हणून काही तरुणांनी त्याला दुरुनच हुसकावुन लावले. व पुढच्या गोंधळालाही रोखले.

वन किंवा वन्यजीवसंदर्भात एखादी घटना घडल्यास कार्यालयीन वेळेशिवाय वन विभागात संपर्क होत नाही. यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी टोल फ्री क्रमांक तयार करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Gaur in Panchganga Ghat area in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.