गॅस्ट्रोने आणखी दोघांचा बळी
By Admin | Updated: November 28, 2014 23:44 IST2014-11-28T23:21:28+5:302014-11-28T23:44:45+5:30
मृतांची संख्या १४ वर : मिरजेत आरोग्य विभागाने घेतले दूषित पाण्याचे नमुने

गॅस्ट्रोने आणखी दोघांचा बळी
मिरज : मिरजेत गॅस्ट्रोसदृश आजाराने आनंदा पारिसा कांबळे (वय ६२, रा. समतानगर, मिरज) व श्रीमती सुलोचना आप्पासाहेब चव्हाण (९०, रा. बालाजीनगर, सांगली-मिरज रोड) या दोघांचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोच्या बळींची संख्या चौदांवर पोहोचली आहे. दिवसभरात नव्याने शहरी व ग्रामीण भागातील १७ रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.
आनंदा पारिसा कांबळे यांना अतिसाराचा त्रास जाणवू लागल्याने शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सांगली-मिरज रोड परिसरातील बालाजीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या श्रीमती सुलोचना चव्हाण यांनाही अतिसाराच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वयोवृद्ध सुलोचना चव्हाण यांच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी पाठविले होते. अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) या त्यांच्या मूळगावी त्यांचा मृत्यू झाला. मिरज शहरात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गॅस्ट्रोचे थैमान सुरूच आहे. शहरात नव्याने गॅस्ट्रोचे १३ रुग्ण आढळले, तर ग्रामीण भागातील चौघांना या साथीची लागण झाली आहे. १७ जणांना उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिरज शहराला आज, शुक्रवारी पुणे आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. कांचन जगताप यांनी भेट देऊन शहरातील गॅस्ट्रोचे रुग्ण आढळलेल्या वखारभाग, नदीवेस, वेताळनगर, कमानवेस, गुरुवारपेठ या भागांची पाहणी केली. त्यांनी या भागातील तपासणीसाठी दूषित पाण्याचे नमुनेही घेतले. आरोग्याच्या दक्षतेबाबत नागरिकांना माहिती देण्याबरोबरच दक्षतेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांच्यासोबत डॉ. सांगले, जिल्हा बालसंगोपनचे डॉ. गिरीगोसावी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी रोहिणी कुलकर्णी उपस्थित होत्या. उपसंचालकांकडून करण्यात आलेल्या गॅस्ट्रो साथीच्या पाहणीचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संभा तालीम, काशीकर मंगल कार्यालय, जामा मशीद, इसापुरे गल्ली, कैकाडी गल्ली व नदीवेस या भागातील जुन्या जलवाहिन्यांवरील नळ कनेक्शन्स खंडित करून नव्या जलवाहिनीवर बसविण्याचे काम सुरू केले आहे.
ग्रामीणच्या चौघांना गॅस्ट्रोची लागण
मिरज शहरात नवीन १३ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले असतानाच मिरज ग्रामीण भागातील धामणी, कर्नाळ, वड्डी व अंकली या चार गावांतील प्रत्येकी एका रुग्णास गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.