गस्त नाय ! मग घर लुटू द्यायचं काय?
By Admin | Updated: August 19, 2015 00:16 IST2015-08-19T00:16:58+5:302015-08-19T00:16:58+5:30
ग्रामस्थांचा पोलिसांना सवाल : प्रत्येक गावात रात्रभर पेट्रोलिंग करा; आम्ही निवांत झोपतो

गस्त नाय ! मग घर लुटू द्यायचं काय?
कोल्हापूर : करवीर, पन्हाळा तालुक्यांत चोरांचा सुळसुळाट असल्याने सर्व गावे भयभीत झाली आहेत. चोऱ्या रोखण्यासाठी रात्रभर गस्त घालताना हुल्लडबाजी झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याची ‘तंबी’ पोलिसांनी दिली आहे. गस्त घालायची नाही तर आमची घरं लुटू द्यायची काय? असा थेट सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ही कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्यातील प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेले महिना-दीड महिना कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थ आपल्यापरीने स्वत:चे संरक्षण करत आहे. ज्यांची घरे शेताच्या जवळ आहेत तिथे तर प्रचंड घबराट आहे. असे असताना पोलीस यंत्रणा मात्र गप्पच आहे. चोरटे नाहीत, केवळ अफवा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, पण प्रत्यक्षदर्शी व्यक्ती चोरांचे वर्णन सांगत आहेत.
वास्तविक चोरीमुळे घबराट पसरली असताना पोलिसांनी रात्रीचे पेट्रोलिंग करून दिलासा देणे अपेक्षित होते. पोलिसांकडून हे होत नसल्याने नागरिक स्वत: गस्त घालत आहेत पण गस्त घालणाऱ्या नागरिकांनाच कारवाईची ‘तंबी’ पोलिसांनी केल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
दिवसभर शेतात, रात्री गस्त
सध्या पावसाची उघडझाप सुरू असल्याने तणांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पिकांची भांगलण करून मेटाकुटीला आलेले आहेत. दिवसभर भांगलण करायची आणि रात्री चोरांच्या भीतीने गस्त घालावी लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत.
पोलीस चौक्या शोभेलाच
गावागावांत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक हैराण असताना पोलीस यंत्रणा मात्र फारशी जागरूक दिसत नाही. पोलीस चौक्यांमध्ये एकही पोलीस कर्मचारी नाही, पोलीस चौक्या म्हणजे शोभेसाठीच दिसत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चोऱ्यांच्या घटनांचा फ ायदा घेत काहीजण पूर्ववैमनस्यातून जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्यासाठी घरांवर दगडफेक करीत आहेत. अशा घटनांमुळे भटक्या विमुक्त बांधवांना पोलीस आणि समाजाकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण नसताना भटक्या विमुक्तांना त्रास दिल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील.
-प्रा. शहाजी कांबळे, प.महाराष्ट्र अध्यक्ष,रिपब्लिकन पक्ष (गवई गट)
‘चोर नाहीच’ म्हणणे हे हास्यास्पद आहे. नागरिक विनाकारण रात्र-रात्रभर जागे कशाला राहतील. पोलिसांनी रात्रीचे पेट्रोलिंग करून विश्वास देणे अपेक्षित होते, पण तसे न करता नागरिकांवरच गुन्हे दाखल करण्याची भाषा अनाकलनीय आहे.
- शशिकांत म्हेत्तर (सरपंच, सांगरूळ)
गावामध्ये गस्तीदरम्यान संशयित आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा. कायदा हातात घेऊ नका. संशयितांना मारहाण केल्यास संबंधितांवर कारवाई होईल.
- डॉ. मनोजकुमार शर्मा,
जिल्हा पोलीसप्रमुख