पुन्हा गॅस ‘लिंकिंग’
By Admin | Updated: November 25, 2014 00:09 IST2014-11-24T23:31:52+5:302014-11-25T00:09:28+5:30
‘आधार’ची सक्ती नाही : केवळ बँक खात्याद्वारे अनुदान; प्रक्रिया डिसेंबरपासून

पुन्हा गॅस ‘लिंकिंग’
प्रवीण देसाई -कोल्हापूर --ग्राहकांच्या बँक खात्यावर गॅस सिलिंडरचे थेट अनुदान जमा करण्याची रखडलेली योजना केंद्र सरकारने पुन्हा सुरू केली आहे. तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा असून, त्याचे प्रत्यक्ष अनुदान १ जानेवारीपासून जमा होणार आहे. मात्र, १ डिसेंबरपासून या प्रक्रियेची सुरुवात होणार आहे. या लिंकिंगसाठी आधार कार्डची सक्ती नसून, फक्त बँक खात्याद्वारेही हे अनुदान ग्राहकांना मिळू शकणार आहे.
गतवर्षी काँग्रेस आघाडीने गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. बॅँक खाते व आधारकार्ड यांचे लिंकिंग झाल्याशिवाय हे अनुदान जमा होत नव्हते. परंतु मधल्या काळात आधारकार्डचाच गोंधळ असल्यामुळे या खात्यांचे लिंकिंग करण्यात अनेक अडचणी आल्या. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ या काळात ही प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यातील २५ टक्के गॅस ग्राहकांचे बॅँकेशी लिंकिंग झाले. यापैकी काही खात्यांवर अनुदानाची रक्कमही जमा झाली. काहींच्या खात्यांवर लिंकिंग होऊनही अनुदान जमा झाले नव्हते. एकंदरीत या योजनेबाबत गोंधळ सुरू होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तत्कालिन काँग्रेस सरकारने ही योजना थांबविली.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पुन्हा ही योजना प्रातिनिधिक स्वरूपात देशातील ५४ जिल्ह्यांत सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्यातील काम लवकरच सुरू होईल यामध्ये आणखी काही जिल्हे असतील तर तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यासह उर्वरित सर्व जिल्ह्यांचे काम सुरू होणार आहे.
तत्पूर्वी या योजनेच्या माहितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे. काही गॅस कंपन्यांनी आतापासूनच मोबाईलवरून एसएमएसद्वारे याबाबत ग्राहकांना माहिती देण्याचे काम सुरू केले आहे. पुन्हा सुरू करण्यात येत असलेल्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये आता आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. आधारकार्डशिवाय निव्वळ बँक खात्यावरसुद्धा हे अनुदान ग्राहकांना मिळेल. ग्राहकांना मात्र दोन्हीही पर्याय देण्यात आले आहेत. या प्रक्रियेसाठी दोन फॉर्म असणार आहेत. पहिला फॉर्म हा आधारकार्डचा तर दुसरा बॅँक खात्याचा हे फॉर्म भरुन बॅँकेत जाऊन त्या ठिकाणी नोंद करून पुन्हा ते संबंधित गॅस एजन्सीमध्ये जमा करायचे आहेत. त्यानंतरच आपले बॅँक खाते लिंक होणार आहे.
अद्याप तरी जिल्हा पुरवठा विभागाला थेट सूचना आल्या नसल्या तरी गॅस कंपन्यांना याबाबत निर्देश मिळाले आहेत. त्यानुसार त्यांचे काम काही गॅस एजन्सीमधून सुरू झाले आहे. प्रत्यक्ष काम १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये या कंपन्यांकडून जनजागृतीसाठी बैठका, प्रशिक्षण, कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.
एक लाखावर ग्राहकांचे ‘आधार’ लिंक
जिल्ह्यातील एकूण ६ लाख ७० हजार गॅस ग्राहकांपैकी आतापर्यंत २ लाख १ हजार ग्राहक एजन्सीकडे लिंक झाले आहेत. त्यापैकी १ लाख १७ हजार ग्राहकांचे बॅँकेत लिंकिंग करण्यात आले आहे. ही संख्या योजना स्थगित करण्यापूर्वीची आहे.
यासंदर्भात सरकारकडून लेखी स्वरूपात अद्याप कोणतेही आदेश आपल्याला प्राप्त झालेले नाहीत, परंतु गॅस कंपन्या व बँकांकडून या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. हे काम मुदतीत पूर्ण करायचे आहे. ते वेळेवर पूर्ण होण्यासाठी या कामावर लक्ष ठेवले जात आहे.
- विवेक आगवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी
जिल्ह्यातील गॅस ग्राहकांच्या बँक खात्यावर १ जानेवारीपासून अनुदान जमा होणार आहे. याबाबत जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना माहिती दिली जाईल. सर्व गॅस कंपन्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यादृष्टीने काम सुरू आहे.
- संजय कर्वे, सेल्स आॅफिसर,
एचपी व जिल्हा समन्वयक
सर्व गॅस कंपन्या