गॅस सिलिंडरच्या टेम्पोला आग
By Admin | Updated: July 31, 2014 23:25 IST2014-07-31T23:16:42+5:302014-07-31T23:25:08+5:30
सायबर चौक येथील घटना : सतर्क तेमुळे अनर्थ टळला

गॅस सिलिंडरच्या टेम्पोला आग
कोल्हापूर : वार गुरुवार, वेळ दुपारी दीडची... सायबर चौक ते विद्यापीठ रोडवर गॅस सिलिंडर घेऊन चाललेल्या टेम्पोच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले. हा प्रकार पाहून बिथरलेल्या चालकाने गाडी रस्त्यावरच थांबविली. टेम्पोत भरलेल्या गॅस सिलिंडरच्या टाक्या पाहून आग विझविण्यासाठी कोणीच पुढे येईना. अखेर एका महिलेने अग्निशामक दलाला फोनवरून घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत इंजिनमधील आग आटोक्यात आणली; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
संभाजीनगर येथील संदीप गॅस एजन्सीचा हौदा टेम्पो (एमएच ०९ सीए ६७६५) भरलेली सुमारे ४० गॅस सिलिंडर घेऊन डिलिव्हरी देण्यासाठी चालला होता. दुपारी दीडच्या सुमारास सायबर चौकमार्गे विद्यापीठ रोडने संभाजीनगरकडे जाताना अचानक टेम्पोच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन धुराचे लोट बाहेर पडू लागले. चालक शिवाजी बनकर याने गाडी जाग्यावरच थांबविली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना हा प्रकार समजताच ते भीतीने पसार होत होते. त्यामुळे आग विझविण्याचे धाडस कोणीच करीत नव्हते. चालक बनकरही झाल्या घटनेने बिथरून गेला होता. टेम्पोमध्ये गॅस सिलिंडर असल्याचे गांभीर्य ओळखून एका जागरूक महिलेने महापालिकेच्या अग्निशामक दलास फोनवरून घटनेची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता सायरन वाजवतच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टेम्पोच्या इंजिनचे बॉनेट उघडून पाण्याचा फवारा मारून आग विझविली. त्यानंतर येथील स्थानिक रहिवाशांचा जीव भांड्यात पडला. आग विझविण्यास विलंब झाला असता, तर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन शहरात मोठी दुर्घटना घडली असती. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान भूपाल तराळ, रघुनाथ पाटील, महावीर म्हासुर्ले, अनिल कारंडे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)