‘राजाराम’च्या गाडीअड्डा जागेवर बगीचा
By Admin | Updated: February 4, 2015 23:58 IST2015-02-04T23:44:44+5:302015-02-04T23:58:17+5:30
महापालिकेचा घाट : सोमवारच्या सभेत ठराव येणार; कारखान्याची न्यायालयात धाव

‘राजाराम’च्या गाडीअड्डा जागेवर बगीचा
संतोष पाटील -कोल्हापूर -कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या गाडीअड्ड्याच्या मध्येच बगीचा करण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेच्या सोमवारी (दि. ९) होणाऱ्या महासभेत ‘राजाराम’च्या, पर्यायाने १५ हजार सभासदांच्या मालकीच्या जागेवर बगीचा करावा, असा ठराव आडमार्गाने आणला आहे. नेत्यांना खूष करण्यासाठीच हा ठराव घुसडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. दरम्यान, याविरोधात राजाराम कारखान्याने न्यायालयात धाव घेतली आहे.
कसबा बावडा येथे १९३२ साली स्थापन झालेला राजाराम कारखाना वाढत्या शहरीकरणात शहरातीलच एक भाग बनून गेला. अत्यंत कमी जागेत असलेल्या या कारखान्याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कसबा बावड्यातील मध्यवस्तीपासूनच रस्त्यावर थांबलेल्या उसाच्या वाहनांचा तब्बल सहा महिने वाहतुकीस अडथळा होत असतो. बावडा परिसरातील ८० टक्के कुटुंबे शेतीवर आधारित असल्याने हा त्रासही नागरिक सहन करतात. कारखान्याला ‘को-जनरेशन प्लॅँट’च्या उभारणीसाठी जागा नसल्याने प्रकल्पच गेली सात वर्षे खोळंबला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ‘राजाराम’च्या व्यवस्थापनाने कारखान्याजवळीलच खासगी जागा विकत घेऊन ती उसाच्या बैलगाड्या थांबण्यासाठी ‘गाडीअड्डा’ म्हणून विकसित केली.
राजाराम कारखान्याच्या जागेवर बगीचासाठी आरक्षण टाकण्याचा ठराव महापालिका महासभेपुढे येत आहे. यापूर्वी असा प्रकार घडल्याने कारखान्याने न्यायालयात दाद मागितली आहे. प्रत्यक्षात नगरसेवकांनी आणलेला हा ठराव महापालिका प्रशासनाने, पर्यायाने नगरविकास विभागाने ठेवल्याचे चित्र भासविण्यात येत आहे. आमदार महाडिक यांना मानणारा नगरसेवकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सभेपुढे हा विषय येताच तो बारगळणार आहे, याची ठराव आणणाऱ्या नगरसेवकांनाही पक्की खात्री आहे. ‘विरोधकांना कसे पळविले’ असे भासवत निव्वळ नेत्यांना खूष करण्यासाठीच ठराव जाहीर करण्याची तसदी घेतल्याची चर्चा आहे.
यापूर्वीही असा प्रकार
कसबा बावड्यातील एका पेट्रोल पंपाजवळील रिकाम्या जागेवर अशाच प्रकारे आरक्षणाचा ठराव आणण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर पडद्यामागे जोरदार हालचाली झाल्या.
मात्र, ‘वजन’ ठेवल्यानंतरच ठराव मागे घेण्यात आला. आरक्षण उठवता येत नाही, तर आरक्षण टाकण्याची भीती दाखवून इप्सित साध्य करण्याची ही नवीन टूम आहे.
मध्यभागीच बाग
दक्षिण-उत्तर अशी एकूण दहा एकर असलेल्या या जागेच्या मध्यभागीच उत्तरेच्या बाजूने दोन एकर जागेवर बगीचा करण्याचा ठराव प्रस्तावित आहे. जेणेकरून बैलगाडीसाठी जाणारी वाटही बंद होऊन उर्वरित जागेचा वापर कारखान्यास करता येऊ नये, अशा पद्धतीनेच ठराव आणला आहे.
कारखाना अगोदरच अत्यंत दाटीवाटीच्या जागेत आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, या उद्देशानेच कारखान्याने ही जागा घेतली. वास्तविक ही जागा
१५ हजार सभासदांची आहे. अशा प्रकारे कारखाना मोडीत काढण्याचा कोणी डाव आखत असल्यास शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना संबंधितांना करावा लागेल.
- दिलीप पाटील
(चेअरमन, राजाराम कारखाना)