उद्यान दिंडीने गार्डन्स क्लबच्या कोल्हापूर पुष्पप्रदर्शनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:16 PM2018-11-24T12:16:02+5:302018-11-24T12:20:46+5:30

झाडे लावा... झाडे जगवा..., झाड दत्तक घेऊया ..., झाडांना करू नका नष्ट...श्वास घेताना होतील कष्ट..., असा संदेश देत उद्यान दिंडीने शुक्रवारी तीन दिवसीय कोल्हापूर महापालिका व गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनाला

In the garden of Dind, the Gardens Club's Kolhapur flower show begins | उद्यान दिंडीने गार्डन्स क्लबच्या कोल्हापूर पुष्पप्रदर्शनाला सुरुवात

उद्यान दिंडीने गार्डन्स क्लबच्या कोल्हापूर पुष्पप्रदर्शनाला सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देगुलाबासह ३० प्रकारची आकर्षक फुले पामसह दहा प्रकारची पाने : उद्यान अवजारांसह विविध प्रकारचे ३० स्टॉल्स

कोल्हापूर : झाडे लावा... झाडे जगवा..., झाड दत्तक घेऊया ..., झाडांना करू नका नष्ट...श्वास घेताना होतील कष्ट..., असा संदेश देत उद्यान दिंडीने शुक्रवारी तीन दिवसीय कोल्हापूर महापालिका व गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनाला सुरुवात झाली. गुलाब, लिमोनियम, जर्बेरा, आर्केड, लॅटिस, पिंक पॉँग, टॉर्च झिंजर अशा विविध ३० प्रकारच्या फुलांचा, तर पामसह १0 प्रकारच्या पानांचा प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

महावीर गार्डन येथे सकाळी ९ वाजता महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते रोपांच्या पालखीचे पूजन होऊन उद्यान दिंडीला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती शांतादेवी डी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण नरके, नगरसेवक विजय सूर्यवंशी, नगरसेवक सत्यजित कदम, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, आदींची होती.

‘झाडे लावा...झाडे जगवा...’, ‘झाड दत्तक घेऊया...’, अशा घोषणा देत ही दिंडी आदित्य कॉर्नर, ताराबाई पार्कमार्गे न्यू शाहूपुरीतील ताराबाई गार्डन येथे विसर्जित झाली. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे एन. एस. एस.चे विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, गार्डन्स क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. यानंतर नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या हस्ते प्रदर्शनातील स्टॉल्सचे उद्घाटन झाले.

या ठिकाणी उद्यानाला लागणारी अवजारे, विविध फुले, फुलझाडे, रोपे, औषधी वनस्पती, लॉन्स, नर्सरीज, खाद्यपदार्थ, असे विविध प्रकारे ३० स्टॉल्स आहेत. दिवसभर या ठिकाणी नागरिकांनी भेट देऊन माहिती घेतली. सायंकाळी सहा वाजता स्वरांगण प्रस्तूत निसर्गसंगीत संध्या हा कार्यक्रम झाला. ‘फुलले मनी चांदणे’ या शिर्षकाखाली रंगलेल्या गायक, वादक यांच्या मैफलीने सायंकाळी रसिक मंत्रमुग्ध झाले.

दरम्यान, सकाळच्या सत्रात लॅँडस्केपिंग स्पर्धा झाली. यामध्ये न्यू आर्किटेक्चर कॉलेज व कलानिकेतन महाविद्यालयाचे ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. आज, शनिवारी व उद्या, रविवारी फ्लॉवर शो होणार आहे. यामध्ये फ्लॉवर ड्रिंक, इकेबाना पुष्परचना, पेपर फ्लॉवर मेकिंग, फ्लोरल हेअर अ‍ॅक्सेसरीज यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. पुष्परचना, लॅँडस्केपिंग, फॅशन शोसह उद्या, रविवारी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.
यावेळी क्लबचे उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, खजानीस राज अथणे, आदी उपस्थित होते.

गार्डन्स क्लब
फोटो ओळी : कोल्हापूर महापालिका व गार्डन्स क्लबतर्फे आयोजित पुष्पप्रदर्शनाची सुरुवात शुक्रवारी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते महावीर गार्डन येथे उद्यान दिंडीच्या उद्घाटनाने झाली. यावेळी शांतादेवी डी. पाटील, शशिकांत कदम, कल्पना सावंत, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
 

Web Title: In the garden of Dind, the Gardens Club's Kolhapur flower show begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.