कोल्हापूर : येथील सोमवार पेठेतील गंजी गल्लीत राहणारा गांजा विक्रेता इरफान खलील मोदी (वय ३७) याला पकडून लक्ष्मीपुरी पोलिसांनी आणखी दोन विक्रेते आणि मिरजेतील पुरवठादारांना अटक केली. यात मिरजेतील महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून पाच किलो ३०४ ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाइल असा सुमारे सव्वादोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. नशामुक्त कोल्हापूर मोहिमेंतर्गत शनिवारी (दि. १९) सायंकाळी ही कारवाई केली.मोदी याच्यासह रमीज शब्बीर बागवान (३०, रा. बिंदू चौक, कोल्हापूर), नईम ऊर्फ दस्तगीर राजू पठाण (वय ३४, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर), शमशुद्दीन सरदार बागवान (४०) आणि मदिना आश्रफ शेख (५०, दोघे रा. मिरज, जि. सांगली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. महंम्मद सैफ नरुलामिन खान पठाण (रा. उमा टॉकीज चौक, कोल्हापूर) याचा शोध सुरू आहे.सोमवार पेठेतील गंजी गल्लीत इरफान मोदी हा गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांना मिळाली होती. मोदी याला अटक करून अधिक चौकशीत रमीज बागवान, महंम्मद पठाण आणि नईम पठाण या विक्रेत्यांची नावे निष्पन्न झाली. यातील दोघांना अटक करून पोलिसांनी गांजाचा पुरवठा करणाऱ्या टोळीला पकडण्याचे नियोजन केले. त्यानुसार अटकेतील नईम मोदी यालाच मिरजेतील पुरवठादारास फोन करायला सांगितले.गांजाची मागणी करून त्यांना निमशिरगाव (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत बोलवले. सापळा रचून पुरवठादार शमशुद्दीन बागवान आणि मदिना शेख यांना पकडले. त्यांच्याकडून गांजा, दुचाकी आणि मोबाइल जप्त केला. न्यायालयात हजर केले असता पाच जणांची गुरुवारपर्यंत (दि. २४) पोलिस कोठडीत रवानगी झाली.यांच्या पथकाने केली कारवाईपोलिस निरीक्षक कन्हेरकर यांच्यासह उपनिरीक्षक खंडू गायकवाड, अंमलदार वाजिद मोमीन, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, तानाजी दावणे, अमित पाटील, शिवाजी जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Kolhapur: गांजा विक्रेत्याला पकडून रचला सापळा; मिरजेच्या पुरवठादारासह पाचजण अटकेत; महिलेचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:19 IST