कोल्हापूर : जयसिंगपूर येथील हॉटेल जयसिंगपूर गेस्ट हाऊसमध्ये सराईत गुंडाने वेटर आणि मॅनेजरला मारहाण करून दरमहा खंडणीची मागणी केली. हा प्रकार बुधवारी (दि. १८) रात्री घडला असून, याबाबत सराईथ गुंड अंकुश जयसिंग कुंभार (वय ३०, रा. दानोळी, ता. शिरोळ) आणि त्याचा मित्र सूरज कोळी (रा. जयसिंगपूर) या दोघांवर जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपक विठ्ठल मडीवाल (वय ३४, रा. वृंदावन कॉलनी, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली.जयसिंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड अंकुश कुंभार याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो फिर्यादी मडीवाल यांच्या हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करून दारू पित होता. बुधवारी रात्री तो मित्रासह बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिल्यानंतर त्याने वेटर पवनकुमार निषाद याला बाटलीने मारहाण केली. समजावण्यासाठी गेलेले मडीवाल यांनाही मारहाण केली. दरमहा दहा हजार रुपये खंडणी दिल्याशिवाय तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देऊन गुंड बाहेर गेले. मडीवाल यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुंडाचा बिअर बारमध्ये धिंगाना, वेटरला मारहाण करून खंडणीची मागणी; जयसिंगपूरमधील प्रकार
By उद्धव गोडसे | Updated: October 21, 2023 13:06 IST