कृषिपंपांची सबमर्सिबल केबल चोरट्यांची टोळी कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:38+5:302021-01-08T05:17:38+5:30
आजरा : आजरा तालुक्यात कृषिपंपांची सबमर्सिबल केबल चोरट्यांची टोळी कार्यरत झाली आहे. हिरण्यकेशी नदीकाठावरील भारनियमन काळात तांब्याच्या केबलवर चोरट्यांनी ...

कृषिपंपांची सबमर्सिबल केबल चोरट्यांची टोळी कार्यरत
आजरा : आजरा तालुक्यात कृषिपंपांची सबमर्सिबल केबल चोरट्यांची टोळी कार्यरत झाली आहे. हिरण्यकेशी नदीकाठावरील भारनियमन काळात तांब्याच्या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खेडे, चांदेवाडी, सुलगाव, हाजगोळी, पेद्रेवाडी येथील शेतकऱ्यांची १२०० ते १२५० मीटर केबल चोरीस गेली आहे.
तालुक्यात कृषिपंपाची संख्या ५७०० इतकी आहे. डांबावरील मीटर ते पाण्याजवळील मोटरपर्यंत २.५ किंवा ४ मि.मी.ची तांब्याची केबल वापरली जाते. चोरटे रात्रीच्यावेळी मीटर असणाऱ्या पेटीचे कुलूप तोडून केबलवर डल्ला मारत आहेत, तर कांही गावातील केबल भारनियमन काळात चोरून नेली आहे. चोरटे रात्रीच्यावेळी हिरण्यकेशी नदीकाठावरील मोटरीवर डल्ला मारत आहेत.
गेल्या चार दिवसांत खेडे, चांदेवाडी, सुलगाव, हाजगोळी व पेद्रेवाडी येथील १५ ते २० मोटरींची केबल चोरीस गेली आहे. चोरट्यांनी ही केबल विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास सापडण्याच्या भीतीने चोरट्यांच्या घरामध्ये स्टॉक केली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुलगाव व चांदेवाडी येथील शेतकऱ्यांनी आजरा पोलीस ठाण्याला केबल चोरीच्या तक्रारी दिल्या आहेत. अद्यापही ऊसतोड झाली नाही. त्यातच केबल चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
-----------------
तांब्याची विक्री
केबल जाळून मिळालेल्या तांब्याची विक्री
सबमर्सिबल केबलमध्ये तांबे असते. केबल चोरीचा बोभाटा सुरू आहे. त्यामुळे अशी तशीच केबल विक्री करण्याचा प्रयत्न झाल्यास सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चोरट्यांनी केबल जाळून मिळालेल्या तांब्याची विक्री होण्याची शक्यता आहे.