गणेशोत्सव वर्गणीचे ‘नो टेन्शन’

By Admin | Updated: August 2, 2015 23:51 IST2015-08-02T23:51:24+5:302015-08-02T23:51:24+5:30

मनपा निवडणूक : इच्छुक आतापासूनच मंडळांच्या संपर्कात

Ganeshotsav's 'No Tension' | गणेशोत्सव वर्गणीचे ‘नो टेन्शन’

गणेशोत्सव वर्गणीचे ‘नो टेन्शन’

गणेश शिंदे -कोल्हापूर -प्रभाग रचना व आरक्षणाच्या सोडतीतून महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पूर्वीच्या सर्वच प्रभागांमध्ये बदल झाल्याने आजी-माजी नगरसेवकांसह ‘भावी’ना ही नव्याने जिंकण्यासाठी जोडण्या कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच एक भाग म्हणून ‘गठ्ठा ’मतदानावर लक्ष ठेवून इच्छुक उमेदवारांनी सार्वजनिक तरुण मंडळांना ‘टार्गेट’ केले आहे. त्यामुळेच यंदा गणेशोत्सव मंडळांनाही वर्गणीचे फारसे ‘टेन्शन’ राहिलेले नाही. त्यामध्ये काही राजकीय पक्षांचे व आघाड्यांच्या कारभाऱ्यांनी जोडण्या सुरू केल्या आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आॅक्टोबरमध्ये तर गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये आहे. निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी प्रभागातील छोटी-मोठी तरुण मंडळे पाठीशी असणे गरजेचे असल्याचे सर्वच इच्छुक नेते व राजकीय पक्षही जाणून आहेत. तरुण मंडळांना आपलेसे करण्यासाठी गणेशोत्सवासारखा दुसरा उत्सव असूच शकत नाही. त्यामुळेच गणेशोत्सव ‘इन कॅश’ करण्यासाठी इच्छुक यंत्रणा सक्रिय झाली आहे.
प्रभाग रचनेत अनेक प्रभागांची अन्य प्रभागांत विभागणी झाली आहे. काही विद्यमान नगरसेवकांच्या मतदारसंघाची काही भाग इतर प्रभागात गेला आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांची नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरातील मदत घेण्यासही प्रयत्न होणार आहे. ‘तू मला मदत कर, मी तुला मदत करतो’, असे ‘एकमेका साह्य करू...’चे चित्र जवळ-जवळ सर्वच प्रभागांत नव्या प्रभाग रचनेमुळे पाहायला मिळत आहे.

राजकीय स्पॉन्सरशीपसाठी चढाओढ !
गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करून त्यांचे स्पॉन्सर घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यासाठी पाहिजे तेवढा जास्त हात सैल केला जाणार आहे. गतवर्षी शहरात सुमारे १२५० तालीम, तरुण मंडळांची नोंद पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यापैकी प्रतिवर्षी गणेशोत्सव विसर्जन (अनंत चतुर्दशी) मिरवणुकीत पाचशेच्यावर गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात. यावरून एकंदरीत, गणेशोत्सव मोठ्या झोकात होणार, अशी चिन्हे आहेत.

मंडळा-मंडळातील पॅचअपवर भर...
तरुण मंडळांमध्ये असणारे मतभेद मिटवून त्यांच्यात पॅचअप करण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे. मंडळा-मंडळांत पॅचअप करून जास्तीत जास्त मते आपल्याकडे खेचण्यासाठी पहिल्या फळीतील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. जुने वाद, तक्रारी, हेवेदावे संपवून एकगठ्ठा मतदानासाठी ताकद लावली जात आहे.

Web Title: Ganeshotsav's 'No Tension'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.