गणेशोत्सवातच मंडळांची ‘दिवाळी’
By Admin | Updated: September 6, 2014 00:41 IST2014-09-06T00:39:01+5:302014-09-06T00:41:28+5:30
इच्छुकांकडून हात ढिले : निवडणुकीपूर्वीच कोट्यवधींचे वाटप

गणेशोत्सवातच मंडळांची ‘दिवाळी’
राजाराम लोंढे -कोल्हापूर --ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव आल्याने गणेशोत्सव मंडळांची चांगलीच चलती आहे. इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येक मंडळाला हजारापासून पन्नास हजारांपर्यंतची मदत वाटप सुरू आहे. कोल्हापूर शहर, करवीर, कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघांत तर दिवाळीपूर्वीच मंडळांच्या कार्यकर्त्यांची ‘दिवाळी’ सुरू झाली आहे. मतदारसंघांतील मंडळांची संख्या पाहिली तर निवडणुकीच्या आधीच कोट्यवधी रुपयांचे वाटप झाल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत पाण्यासारखा पैसा वाहणार हे निश्चित आहे.
सर्वच प्रकारच्या निवडणुका या तरुणांच्या हातात गेल्या आहेत, किंबहुना तरुणांनीच निवडणुका हातात घेतल्याचे चित्र अलीकडील निवडणूक निकालावरून स्पष्ट होते. त्यामुळे तरुण मंडळांचे राजकारणातील महत्त्व वाढले आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मंडळांची पर्यायाने तरुणांची भूमिकाच निर्णायक ठरल्याचे आपण पाहतो. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी तरुण मंडळांच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. गणेशोत्सवाला दरवर्षी राजकीय मंडळी हजेरी लावून मंडळांना मदत करतात. पण यावर्षीच्या गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार असल्याने इच्छुक तरुण मंडळांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
विधानसभा मतदारसंघाचा विस्तार पाहिला तर एका मतदारसंघात लहान-मोठी किमान अडीच हजार मंडळे कार्यरत असतात. या मंडळांना प्रत्येक एक हजारापासून पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत इच्छुकांकडून देण्यास सुरुवात झाली आहे. मंडळांची संख्या आणि मदत पाहिली तर कोट्यवधी रुपये गणेशोत्सव मदतीच्या माध्यमातून वाटप होणार आहे. त्यात ज्या मतदारसंघांत काटा लढत आहे, तेथील मंडळांना भरभरून मदत मिळते. दोन-तीन इच्छुकांकडून पाकीट येऊ लागल्याने मंडळांचे कार्यकर्तेही अचंबित झाले असून विरोधकाचे पाकीट आम्हाला कसे आले? याची चर्चाही कोल्हापूर शहरात जोरात सुरू आहे.
डॉल्बी,
मंडपाचेही वाटप
आर्थिक मदत नको, डॉल्बीसह मंडप, मंदिराची मागणी मंडळांकडून इच्छुकांकडे केली जाते. पंचवीस ते तीस हजार रुपयांचा डॉल्बीचे वाटपही मंडळांना केले जाते तर निवडून आलो की मंदिरासाठी एक लाख रुपये देण्याची ग्वाहीही इच्छुकांकडून दिल जात आहे.
टोकाचा संघर्ष असणाऱ्या करवीर मतदारसंघात सध्या पाकिटाच्या वजनाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जोरात सुरू आहे. येथे एका इच्छुकाने मंडळांना ताकदीप्रमाणे (मंडळाच्या) दोन ते पाच हजार रुपयांची मदत दिल्यानंतर अस्वस्थ झालेल्या विरोधी कार्यकर्त्यांनी,आपले पाकीट जरा हलकं झाल्याची तक्रारी थेट नेत्यांकडे सुरू केल्या आहेत, यावर हा तर ट्रेलर आहे...असे सांगत कार्यकर्त्यांचे समाधान केले जात आहे.
सुगी सुरू झाली की बारा बलुतेदारांना चांगले दिवस येतात. त्याप्रमाणे निवडणुका जवळ येऊ लागल्या की मंडळाच्या सुगीच्या दिवसाला सुरुवात होते. त्यामुळे मंडळाच्या संख्येतही वाढ होते. विशेषत: ग्रामीण भागात हा प्रकार जास्त पाहावयास मिळतो.