पोलिसांची हेल्मेटसाठी ‘गांधीगिरी’
By Admin | Updated: July 13, 2017 00:43 IST2017-07-13T00:34:48+5:302017-07-13T00:43:14+5:30
वाहतूक शाखेकडून गुलाबपुष्प : शहरातील पाच चौकांमध्ये केले प्रबोधन

पोलिसांची हेल्मेटसाठी ‘गांधीगिरी’
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अपघातामध्ये ‘हेल्मेट’ न घातल्याने अनेक दुचाकी वाहनधारकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना दंड आकारण्याऐवजी गुलाबपुष्प देऊन अनोख्या, गांधीगिरी पद्धतीने दुचाकीस्वारांचे बुधवारी प्रबोधन करण्यात आले. आरएसपी व शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शहरातील पाच चौकांत पोलिसांतर्फे प्रबोधन केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने राज्यात सर्वच ठिकाणी हेल्मेटसक्ती केली आहे. जे हेल्मेट वापरत नाहीत, त्या वाहनधारकांवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. तत्पूर्वी वाहनधारकांना सूचना व हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोरे यांच्यासह कर्मचारी, शहरातील वेगवेगळ्या शाळांतील ‘एनसीसी’चे छात्र व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत जे दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत त्यांना ‘हेल्मेट का वापरायचे?’ याची माहिती लिहिलेले पत्रक व गुलाबपुष्प देऊन त्यांचे प्रबोधन केले.
सीपीआर रुग्णालयासमोरील चौक, दाभोळकर कॉर्नर, राजारामपुरीतील जनता बझार, ताराराणी चौक, शिवाजी पूल या ठिकाणी प्रबोधन करण्यात आले.
सर सलामत तो पगडी पचास...!
वाहतूक शाखेच्या वतीने वाटण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सर सलामत तो पगडी पचास... असा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. यासह वाहतुकीचे नियम आणि लेनची शिस्त पाळा, सिग्नल दिशादर्शक फलक आणि पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करू नका, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नका, वाहन चालविताना मोबाईल वापरू नका, ट्रिपल सीट प्रवास करू नका, वाहन चालविताना घाई-गडबड करू नका, असे नियम लिहिण्यात आले होते.
कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे बुधवारी सीपीआर रुग्णालयासमोरील चौकात वाहनधारकांना गुलाबपुष्प व वाहतुकीचे नियम सांगणारे परिपत्रक देऊन हेल्मेटबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती करताना शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते.