रत्नागिरी लसीकरण केंद्रावर गाेंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:50+5:302021-05-12T04:25:50+5:30
रत्नागिरी : शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने ...

रत्नागिरी लसीकरण केंद्रावर गाेंधळ; पोलिसांचा हस्तक्षेप
रत्नागिरी : शहरातील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गाेंधळ उडाला. त्यामुळे या केंद्रावर पाेलिसांना पाचारण करावे लागले. सायंकाळपर्यंत हा घाेळ सुरूच हाेता.
सध्या ऑनलाईन व अन्य मार्गाने लसी मिळत नसल्याने लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत़ मंगळवारी मिस्त्री हायस्कूल केंद्रावर सकाळी १८ ते ४४ वर्षांकरिता ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून लस देण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे ती घेण्यासाठी लोक त्याठिकाणी उपस्थित होते. याच केंद्रावर दुपारनंतर ४५ वर्षांवरील लोकांसाठी दुसऱ्या लसीचा कार्यक्रम होता; परंतु अनेक केंद्रांवर लसींचा साठा अपुरा येत असल्यामुळे ४५वरील अनेकांच्या दुसऱ्या लसीची मुदत संपत आल्याने लस मिळण्यासाठी नागरिकांनी सकाळी ५ वाजल्यापासून रांग लावली होती. त्यामुळे याठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडाला. याठिकाणी वादावादीचे प्रसंग सुरू झाले.
दरम्यान, यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले़ पोलिसांनी हस्तक्षेप करून दुपारनंतर असणाऱ्या लसीकरणासाठी आलेल्या लोकांना तेथून बाजूला केले. त्यामुळे लोकांमध्ये आणखी संतापाचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासून रांगा लावूनही लस मिळणार नसेल तर काय करायचे असा प्रश्न विचारला गेला, तर लसीकरणासाठी थेट आलेल्या लोकांनी गर्दी पाहून तेथूनच माघारी परतण्याचा निर्णय घेतल, तर सायंकाळी लसीचा कार्यक्रम सुरू हाेताच केवळ एका तासातच लसीकरण बंद केल्याने नागरिक आणखीनच संतप्त झाले. त्यामुळे वातावरण तापले हाेते.
---------------------------------------------------------
सातारा जिल्ह्यात लस संपली तरी केंद्रावर गर्दी
सातारा : शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने मंगळवारी लसीकरण मोहिमेला खो बसला. लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केलेले लोक केंद्रावरील बोर्ड पाहून नाराज होऊन घरी परत गेले. मंगळवारी नेहमीप्रमाणे वय वर्षे ४५ च्या वरील नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी केली होती. तास -दीड तास लोक लसीकरण केंद्रावर थांबून होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने लस संपल्याचा फलक जागोजागी लावण्यात आला.
---------------------------------------------------------
कोल्हापुरात १,०७९ नागरिकांचे लसीकरण
कोल्हापूर शहरात मंगळवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये मिळून एकूण १,०७९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.