जिल्हा बँकेत राजेंद्र पाटील यांच्या विरोधात गणपतराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:25 IST2021-09-19T04:25:14+5:302021-09-19T04:25:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात शिरोळमधील सर्व विरोधकांनी मोट बांधली ...

Ganapatrao Patil against Rajendra Patil in District Bank | जिल्हा बँकेत राजेंद्र पाटील यांच्या विरोधात गणपतराव पाटील

जिल्हा बँकेत राजेंद्र पाटील यांच्या विरोधात गणपतराव पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात शिरोळमधील सर्व विरोधकांनी मोट बांधली आहे. विकास संस्था गटातून पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिरोळ तालुक्यातून गेल्या निवडणुकीत विकास संस्था गटातून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्या वेळी नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात छुपी यंत्रणा सक्रिय झाली होती. पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याच्या हालचाली गेल्या सहा महिन्यांपासून शिरोळमध्ये सुरू आहेत. त्यातूनच गणपतराव पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांच्या गटाने केली होती. त्यानंतर शनिवारी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या घरी सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये विकास संस्था गटातून गणपतराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीला ‘स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, ‘दत्त’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, ‘गोकुळ’चे माजी संचालक अनिल यादव, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंगेजखान पठाण, धनाजीराव जगदाळे, महादेव धनवडे आदी उपस्थित हाेते.

जिल्हा बँकेच्या आडून लोकसभा, विधानसभेची गणिते

विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ‘स्वाभिमानी’सह शिवसेनेला हादरा दिला होता. तेव्हापासून यड्रावकर यांच्या विराेधात सगळे सक्रिय झाले होते, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांचे नाव पुढे करून त्या आडून लोकसभा व विधानसभेची गणिते सोडवली जाणार, अशी चर्चा सुरू आहे.

कोट-

शिरोळ तालुक्यात एका घराभोवतीच सत्तेचे केंद्रीकरण फिरत असल्याने बहुजन समाजावर अन्याय होत आहे. ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत लवकरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेणार आहे.

- दिलीप पाटील (माजी अध्यक्ष, ‘गोकुळ’)

फोटो ओळी : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी शिरोळमध्ये शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या वेळी उल्हास पाटील, राजू शेट्टी, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अनिल यादव आदी उपस्थित हाेते. (फोटो-१८०९२०२१-कोल-शिरोळ)

Web Title: Ganapatrao Patil against Rajendra Patil in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.