‘आपले बाप्पा’मुळे रंगात रंगुनी गेला गणेशोत्सव
By Admin | Updated: September 26, 2015 00:59 IST2015-09-26T00:43:30+5:302015-09-26T00:59:13+5:30
स्पर्धांना भरघोस प्रतिसाद : ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंचचे आयोजन; विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षिसांची लयलूट

‘आपले बाप्पा’मुळे रंगात रंगुनी गेला गणेशोत्सव
कोल्हापूर : ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’ प्रस्तुत ‘आपले बाप्पा’ या कार्यक्रमात सखींनी विविध सांस्कृतिक स्पर्धांचा मनसोक्त आनंद येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात गुरुवारी लुटला. ‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात मोदक स्पर्धा, रांगोळी आणि पुष्पहार स्पर्धांमध्ये सखींनी हिरिरीने भाग घेत आपल्या कल्पकतेला वाव दिला. सखींनी तयार केलेले विविध प्रकारचे मोदक, रांगोळी, फुलेपानांतून साकारलेली गणेशाची विविध रूपे आणि आकर्षक पुष्पहार यांमुळे व्ही. टी. पाटील स्मृतिभवनातील वातावरण गणेशमय होऊन गेले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले.
विविध स्पर्धानंतर सभागृहात झालेल्या बक्षीस वितरण समारंभावेळी सखींनी जल्लोषी प्रतिसाद दिला. यावेळी आयोजिन केलेल्या ‘पैठणी साडी गेम शो’ अंतर्गत झालेल्या उड्या मारणे, फुगे फोडणे, चेंडू टाकणे या स्पर्धांमध्ये तब्बल २६ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अतिशय चुरशीने सुमारे तासभर चालेल्या या स्पर्धेत वैशाली पाटील यांनी पैठणीचा मान पटकावला. पूनम सुतार या उपविजेत्या ठरल्या. उपस्थित सखींसाठी लकी ड्रॉ काढण्यात
आला.
कलर्स वाहिनीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी ‘बालिका वधू’ ही मालिका सोमवारी ते शनिवारी दररोज रात्री आठ वाजता प्रसारित होते. या मालिकेने सर्वांत जास्त भाग दाखविण्याचा मान मिळविला आहे. लवकरच या मालिकेचे २००० भाग पूर्ण होतील. ‘बालविवाह’ प्रथेविरोधात लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष या मालिकेतून दाखविण्यात आला आहे. आनंदीच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.
तिची मुलगी कशी सापडेल? ती आनंदीला आई म्हणून स्वीकारील का? या सर्व प्रश्नांची गुपिते २००० व्या भागात उलगडणार आहेत. या मालिकेबद्दल प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल आहे.
या पार्श्वभूमीवर सूत्रसंचालकांनी मालिकेशी संबंधित प्रश्न महिलांना विचारले. उत्तरे देण्यासाठी महिलांमध्ये चढाओढ सुरू होती. यावरुनच या मालिकेची लोकप्रियता लक्षात आली. मालिकेवरील प्रश्नांची बिनचूक उत्तरे देत सखींनी बक्षिसे पटकावली. यावेळी सखींनी दिलखुलास जल्लोष केला.
वन मिनिट गेम शो, होम मिनिस्टर या स्पर्धांतही सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत बक्षिसांची लयलूट केली. याप्रसंगी झालेल्या लकी ड्रॉमध्ये पद्मजा वारके आणि गीतांजली ह्या विजेत्या ठरल्या.
यावेळी ‘हॉटेल पर्ल’च्या संचालिका कविता घाटगे, उद्योजिका संध्या कुंभारे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरविण्यात आले. मनीषा झेले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
सर्जनशीलतेचा आविष्कार
मोदक स्पर्धेत उकडीच्या मोदकांपासून चेरीच्या मोदकांपर्यंत अनेक प्रकारचे मोदक सखींनी सादर केले होते. प्रत्येक मोदकाबरोबरच त्याच्या कृतीची माहिती सविस्तरपणे देण्यात आली होती. विड्याची पाने, खजूर, बीट, कडधान्यांचे मोड यांपासून मोदक तयार करण्यात आले होते. रंगीबेरंगी मोदक लक्ष आकर्षित करीत होते. रांगोळी स्पर्धेत सखींनी रंगीबेरंगी रांगोळीबरोबरच अगदी पिंपळाच्या पानापासून ते कडधान्ये आणि पानाफुलांचा वापर करून विघ्नहर्त्याची विविध रूपे साकारली होती. महिलांच्या सर्जनशील आणि कल्पनाशक्तीची प्रचितीच जणू रांगोळी स्पर्धेतून आली. सोनाली उपाध्ये, परिमला कुंभोजकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. शुभलक्ष्मी देसाई, प्रिया मेंच, गीता जरग, वंदना तोडकर, राधिका कुलकर्णी, दीप्ती सासने, सुनीता सुतार, स्मिता ओतारी, आशा माळकर यांनी संयोजन साहाय्य केले.
स्पर्धेतील विजेत्या
मोदक : वनिता बक्षी - प्रथम, वीणा सरनाईक - द्वितीय, स्वप्ना वणकुद्रे - तृतीय.
उत्तेजनार्थ - जयश्री गुळवणी, वनिता ढवळे
पुष्पहार : अमरजा नाझरे - प्रथम, मालवी दळवी - द्वितीय, राधिका खडके : तृतीय.
उत्तेजनार्थ : वनिता ढवळे, वंदना महेकर.
रांगोळी : भारती तोडकर - प्रथम, कल्पना आयरे - द्वितीय, शारदा रेठरेकर - तृतीय. उत्तेजनार्थ : क्रांती गोनुगडे, कविता पाटील.