जुगार जोमात अन् पोलीस कोमात
By Admin | Updated: December 5, 2014 00:22 IST2014-12-05T00:14:29+5:302014-12-05T00:22:38+5:30
क्लबच्या नावाखाली अवैध धंदे : पोलिसांचे व्यावसायिकांशी छुप्या मार्गाने लागेबांधे

जुगार जोमात अन् पोलीस कोमात
एकनाथ पाटील - कोल्हापूर -खून, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, मारामारी, दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांशी काही पोलिसांचे छुप्या मार्गाने लागेबांधे असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. क्लबच्या नावाखाली जिल्ह्णांत राजरोस जुगार सुरू असून काही क्लबमध्ये पोलिसांची भागीदारी असल्याचे समजते. पोलीस यंत्रणेतील एक वर्ग छुप्या मार्गाने हप्ते गोळा करीत असून ‘क्लब’च्या नावाखाली ‘जुगार जोमात आणि पोलीस कोमात’ अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. हाताबाहेर गेलेल्या यंत्रणेला पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी वेळीच लगाम घालण्याची गरज आहे.
जिल्ह्यात एकीकडे गुन्हे उघडकीस येत असताना दुसरीकडे मात्र क्राईम रेट दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी सुरुवातीपासूनच पोलीस यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, असे कठोर शब्दांत त्यांनी २८ पोलीस ठाण्यांच्या पोलीसप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. खून, दरोड्याचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे; परंतु दाखवायचे वेगळे आणि खायचे वेळगे दात अशी यंत्रणा काही पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे. ही यंत्रणा छुप्या मार्गाने अवैध व्यावसायिकांना अभय देत असल्याने जिल्ह्यात देशी दारू अड्ड्यांसह मटका-जुगार, क्लब, सेक्स रॅकेट राजरोस सुरू असले, तरी याची कल्पना मात्र पोलीस अधीक्षकांना नाही. डॉ. शर्मा यांनी मुख्यालयात क्राईम बैठक बोलावली की त्यावेळी आमच्या हद्दीमध्ये एकही अवैध धंदा सुरू नसल्याचे अधिकारी छातीठोक सांगतात. मात्र, त्यांच्याच हद्दीत ‘एक बंद तर दोन सुरू’ अशी अवस्था आहे.
गुन्हे शाखेच्या (डीबी) पथकातील काहीजण रूबाब ठोकण्यातच आघाडीवर आहेत. रेकॉर्डवरील आरोपींशिवाय कोणताही आव्हानात्मक गुन्हा त्यांच्याकडून अद्याप उघडकीस आलेला नाही. हद्दीतील राजकीय गुन्हेगारांच्या अवती-भोवती मिरवणे, चौकातील पानटपरीवर फुकटचे पान खाणे, ठरलेल्या लॉज-हॉटेलमध्ये दोन-दोन तास विश्रांती करण्यात ते माहीर असल्याचे दिसून येत आहे.
‘सफारी कलेक्टर’
शहरातील एका संवेदनशील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या पिढ्या सांभाळत आलेला ‘सफारी कलेक्टर’ गावच्या पाटीलकीप्रमाणे तो या ठाण्याचा वारसा चालवित आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक पोलीस निरीक्षकाला तोच हवा असतो. त्याच्याशिवाय इथे पानही हालत नाही. त्याच्या बदलीचे धाडस कुणी करीत नाही. मटका, क्लबवाल्यांकडून दरमहा २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत हप्ते गोळा करणाऱ्या या कलेक्टरला पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा चाप लावणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणी पोलीस अथवा अधिकारी गैरकाम करीत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. जिल्ह्यातील किती क्लबना परवानगी दिली आहे, त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली आहे. त्यांच्या यादीमध्ये जे क्लब नाहीत, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जातील.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक