गायकवाड टोळीला ‘मोक्का’

By Admin | Updated: September 2, 2015 00:16 IST2015-09-02T00:16:11+5:302015-09-02T00:16:11+5:30

पोलिसांची कारवाई : नगरसेवकाचा पुतण्या, मुलासह चौघांचा समावेश

Gaikwad gang gets 'Moka' | गायकवाड टोळीला ‘मोक्का’

गायकवाड टोळीला ‘मोक्का’

कोल्हापूर : खंडणी, अपहरण, खुनी हल्ला यासारखे १५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंड शशिकांत गायकवाड यांच्यासह चौघांवर मंगळवारी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. आगामी गणेशोत्सव व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. संशयित टोळीप्रमुख शशिकांत बाबासाहेब गायकवाड (वय २६), कुणाल राजाराम गायकवाड (२६), सिद्धार्थ राजाराम माने (२२), निवास दत्तात्रय जाधव (२३, सर्व रा. रमणमळा, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत. रमणमळा परिसरातील नगरसेवक राजाराम गायकवाड यांचा शशिकांत हा पुतण्या तर कुणाल हा मुलगा आहे.
शशिकांत गायकवाड याच्या टोळीची रमणमळा परिसरात दहशत आहे. दि. १५ जून २०१५ रोजी शशिकांत व त्याच्या साथीदारांनी शिंदे गल्ली येथे विजय मोरेंकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण केली होती. विरोध करणाऱ्या तरुणांवर त्याने कोयता, लोखंडी गजाने हल्ला केला होता. याप्रकरणी विकास अशोक राणे (२४) याने शाहूपुरी पोलीसात संशयितांच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली होती. सध्या शशिकांत व त्याचे साथीदार बिंदू चौक कारागृहात आहेत.
शशिकांत गायकवाड याच्या टोळीच्या विरोधात २००८ ते २०१५ अखेर शाहूपुरी, राजारामपुरी व भुदरगड पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण, दरोडा दुखापत, खुनी हल्ला आदी १५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. रमणमळा परिसरात या टोळीची प्रचंड दहशत आहे.
त्यामुळे आगामी गणेशोत्सव व महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, या उद्देशाने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी या टोळीच्या विरोधात मोका कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास वर्मा यांनी मंजुरी देत संशयित टोळीप्रमुख शशिकांत गायकवाड, कुणाल गायकवाड, सिद्धार्थ माने, निवास जाधव आदींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१ते ४) २३ (१-अ) प्रमाणे मोकाची कारवाई केली.

पोलिसांचे कौतुक
रमणमळा परिसरात गायकवाड टोळीचे वर्चस्व आणि दहशत मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्या विरोधात पुढे येण्याचे कोणी धाडसही करत नव्हते. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी या टोळीवर मोका लावून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.

गुन्हेगारी टोळ्या हादरल्या
संघटितपणे गंभीर गुन्हे करून जनतेमध्ये दहशत माजवून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळी, गँगवार आदींच्यावर मोकाअंतर्गत कारवाई केली जाते. कोल्हापूर शहरातून एस.टी., आर. सी. या गँगसह आणखी चार प्रसिद्ध टोळ्यांवर मोकाचे प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे दाखल आहेत. त्यांच्यावरही लवकरच मोकाची कारवाई केली जाणार आहे. गायकवाड टोळीवरील कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्या हादरल्या आहेत.


दहा वर्षांतील
चौथी कारवाई
संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम विलास व संजय वास्कर त्यानंतर नेताजी व शिवाजी या बंधंूना ‘मोका’ लावण्यात आला होता. अवधूत माळवी खूनप्रकरणी संजय वास्कर, नितीन वेताळ, गोविंद नायडू यांनाही ‘मोक्का’ लावण्यात आला होता

Web Title: Gaikwad gang gets 'Moka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.