‘गायकवाड कारखाना’ अथणी शुगर्सकडे
By Admin | Updated: July 31, 2014 00:38 IST2014-07-31T00:33:38+5:302014-07-31T00:38:11+5:30
राज्य बँकेचा निर्णय : हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा

‘गायकवाड कारखाना’ अथणी शुगर्सकडे
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
सोनवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने कर्नाटकातील अथणी शुगर्स या खासगी कारखान्यास भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत सूत्रांनीच ही माहिती दिली. बँकेच्या करारास साखर आयुक्तांनी मंजुरी दिल्यास यंदाचा हंगाम घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. यंदाचा हंगाम काही झाले, तरी घ्यायचाच असाच प्रयत्न अथनी शुगर्सचाही आहे. काँग्रेसचे माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचा मुलगा व ‘राष्ट्रवादी’चे नेते मानसिंगराव गायकवाड हे या कारखान्याचे सर्वेसर्वा आहेत. सहकारातील खासगीस चालविण्यास दिलेला हा जिल्ह्यातील चौथा कारखाना आहे.
हा कारखाना राज्य बँकेने गेल्यावर्षी कर्जाच्या वसुलीसाठी २५ सप्टेंबरला जप्त केला. बँकेचे कारखान्यांवर सुमारे १९ कोटींचे कर्ज आहे. त्याशिवाय इतर बँकांची सहभागातील कर्जे प्रचंड आहेत. त्याच्या वसुलीसाठी वारंवार मुदत देऊन व प्रयत्न करूनही काहीच उपयोग न झाल्याने शेवटी सिक्युरिटायझेशन कायद्यान्वये तो जप्त करण्यात आला. अपुरा ऊस, गलथान व्यवस्थापन आणि मनापासून कारखान्याच्या कारभारात कुणीच लक्ष न घातल्याने हा कारखाना जन्मापासूनच आजारी होता; परंतु तरीही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक राजकारणातून आर्थिक मदत करीत राहिल्याने कारखाना कसाबसा सुरू राहिला. मागील चारवर्षांपूर्वी तो ‘रेणुका शुगर्स’ला चालविण्यास देण्यात आला होता. त्यानंतर दोनवर्षे शिराळ्याच्या विश्वासराव नाईक साखर कारखान्याने तो चालविला. गेल्यावर्षी तो बेळगावच्या ‘कुमुदा शुगर्स’ला चालविण्यास दिला. साडेसहा कोटी रुपये भाड्यापोटी हा व्यवहार ठरला होता. त्यानुसार त्या कंपनीने त्यातील तीन कोटी रुपये दिले. पुढील रकमेचा कुमुदाने दिलेला धनादेश न वठल्याने करार मोडला. कुमुदाने हंगाम निम्म्यातच सोडला. त्यामुळे कारखाना नव्याने भाडे तत्त्वावर चालवायला देण्यासाठी राज्य बँकेने निविदा मागविल्या होत्या. त्यातील ‘अथनी शुगर्स’च्या प्रस्तावास मान्यता दिली असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी ‘लोकमत’ला दिली. अन्य अनुषंगिक प्रक्रिया व साखर आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर कारखाना चालवायला देण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.