गगनबावडा ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:41+5:302021-03-27T04:24:41+5:30
गगनबावडा ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक समस्या तोंड वर काढत आहेत. कर्मचारी भरती, त्याचबरोबर स्लॅब गळती, बंद मशिनरी अशा अनेक ...

गगनबावडा ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात
गगनबावडा ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक समस्या तोंड वर काढत आहेत. कर्मचारी भरती, त्याचबरोबर स्लॅब गळती, बंद मशिनरी अशा अनेक समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. या रुग्णालयात १०२ या गाडीवर एक डिसेंबरपासून चालक नसल्याने गाडी बंद अवस्थेत आहे. या गाडीचा उपयोग गरोदर माता व पाच वर्षांच्या आतील बालकांसाठी केला जातो. तालुक्यातील नेतेमंडळीनी १०८ ही गाडी या रुग्णालयाला मिळविण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याचे बोलले जात आहे. १०२ गाडी बंद असल्याने १०८ गाडी ही गाडी कळे, सांगरूळ, बाजारभोगाव, निवडे-साळवण, कोल्हापूर या ठिकाणांहून मागवावी लागते.
या रुग्णालयात प्रत्येक वर्षी सर्पदंशाचे किमान शंभर रुग्ण आढळतात; पण लॅब टेक्निशियन उपलब्ध नसल्याने संबंधित रुग्णाला खासगी गाडीमधून कोल्हापूरला घेऊन जावे लागते. रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी असलेल्या धर्मशाळेत रुग्णालयाचे कर्मचारी राहत आहेत; तर नातेवाइकांना रुग्णाच्या कॉटखाली झोपावे लागत आहे. नातेवाइकांचे मनोरंजन करण्यासाठी असणारा टीव्ही कर्मचाऱ्यांच्या खोलीमध्ये लावला आहे. या ठिकाणी दोन अ वर्ग अधिकारी नेमणूक असूनही एकच अधिकारी कार्यरत आहेत; तर दुसरा अधिकारी महिन्यातून एकदा किंवा दुसऱ्यांदा रुग्णालयात येतो. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी या रुग्णालयाची पाहणी केली व रुग्णांसमोर प्रशासनावर आश्वासनांची खैरात केली; पण अद्याप एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही.