गगनबावडा ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:04+5:302021-01-04T04:21:04+5:30
गगनबावडा : गगनबावडा ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सापडले असून, प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगले आहे. पण, तालुक्यातील नेतेमंडळी मात्र ...

गगनबावडा ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात
गगनबावडा : गगनबावडा ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सापडले असून, प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगले आहे. पण, तालुक्यातील नेतेमंडळी मात्र या ग्रामीण रुग्णालयात आश्वासनांची खैरात करीत आहेत, तर खासदार मंडलिक यांनी दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मशिनरी जळाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक समस्या तोंड वर काढत आहेत. कर्मचारी भरती त्याचबरोबर स्लॅब गळती, बंद मशिनरी अशा अनेक समस्या पुढे येऊ लागल्या आहेत, या रुग्णालयात १०२ या गाडीवर एक डिसेंबरपासून ड्रायव्हर नसल्याने गाडी बंद अवस्थेत आहे. या गाडीचा उपयोग गरोदर माता व पाच वर्षांच्या आतील बालकांसाठी केला जातो. तालुक्यातील नेतेमंडळींनी १०८ ही गाडी या रुग्णालयाला मिळविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे बोलले जात आहे. १०२ गाडी बंद असल्याने १०८ गाडी ही गाडी कळे, सांगरूळ, बाजारभोगाव, निवडे-साळवण, कोल्हापूर या ठिकाणांहून मागवावी लागते. या रुग्णालयात प्रत्येक वर्षी सर्पदंशाचे किमान शंभर रुग्ण आढळतात; पण लॅब टेक्निशियन उपलब्ध नसल्याने संबंधित रुग्णाला खासगी गाडीमधून कोल्हापूरला घेऊन जावे लागते. तर रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी असलेल्या धर्मशाळेत रुग्णालयाचे कर्मचारी राहत आहेत, तर नातेवाइकांना रुग्णाच्या कॉटखाली झोपावे लागत आहे. नातेवाइकांचे मनोरंजन करण्यासाठी असणारा टीव्ही कर्मचाऱ्यांच्या खोलीमध्ये लावला आहे. या ठिकाणी दोन अ वर्ग अधिकारी नेमणूक असूनही एकच अधिकारी कार्यरत आहे, तर दुसरा अधिकारी महिन्यातून एकदा किंवा दुसऱ्यांदा रुग्णालयात येतो. दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी या रुग्णालयाची पाहणी केली व रुग्णांच्या समोर प्रशासनावर आश्वासनांची खैरात केली; पण अद्याप एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. तसेच या रुग्णालयाला खासदार संजय मंडलिक यांनी एक्स-रे मशीन दिले आहे. ते चालविण्यासाठी कर्मचारी नसल्याने मशीन धूळ खात पडले आहे, तर लहान बालकाला सुरक्षित ठेवण्यासाठी काचेची इलेक्ट्रिक पेटी दिली असून, या रुग्णालयातील दुसऱ्या डिलिव्हरी कॅम्पच्या वेळी पेटीतील वायरिंग जळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बरोबर खासदारांच्या कामाचेही परिसरातील नागरिक हसे उडवत आहेत.
चौकट
गगनबावडा रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ. दाते यांचा मनमानी कारभार चालला असून, रुग्णालयातून दोन पगारामध्ये एकच डॉ. काम करीत आहे.