गगनबावड्याच्या सरपंच अंकिता चव्हाण पदमुक्त
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T00:21:04+5:302015-07-25T01:13:30+5:30
विभागीय आयुक्तांचे लेखी निर्देश : तत्कालीन ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार

गगनबावड्याच्या सरपंच अंकिता चव्हाण पदमुक्त
कोल्हापूर : पक्के बांधकाम जागा प्रकरणात बेदरकारपणा, मागासवर्गीय अनुदान अपहार आणि बेकायदा वृक्षतोड यांत दोषी आढळल्याने गगनबावडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अंकिता अरुण चव्हाण यांना पदमुक्त करण्यात येत आहे. शिवाय त्यांना साहाय्य करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे, असे लेखी निर्देश पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांना बुधवारी दिले.
गगनबावडा ग्रामपंचायतीत गैरकारभार सुरू असल्याच्या तक्रारी फेब्रुवारी २०१३ मध्ये जिल्हा परिषदेकडे झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने चौकशीची प्रक्रिया सुरू होती. मौजे गगनबावडा येथील गट नंबर ६३४ आणि ३५ ची वृक्षतोड, सरकारी जागेत घराचे पक्के बांधकाम, १५ टक्के मागासवर्गीय खर्च याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी आणि त्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात ग्रामपंचायतीच्या कामकाजावर बोट ठेवले होते. तसेच विद्यमान सरपंच अंकिता चव्हाण, उपसरपंच अरुण चव्हाण आणि अन्य सात सदस्यांकडून राजीनामे घेण्यासह तत्कालीन ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस आयुक्तांकडे फेब्रुवारी २०१५ मध्ये केली होती. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या चौकशी अहवालावर १७ जून रोजी विभागीय आयुक्तालयात सुनावणी झाली. यात घरकुल योजनेत ११ महिने करारावर दिल्या जाणाऱ्या जागांमध्ये वशिलेबाजी झाल्याचे निष्पन्न झाले.
गगनबावड्यातील मिळकत नंबर ५७७ या सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधलेली पक्की घरे. तसेच ग्रामपंचायतीने भाडेपट्टीवर दिलेल्या जागेवर पक्के बांधकाम होताना ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीने केलेले दुर्लक्ष. यांमुळे ग्रामपंचायत सदस्यांनी कर्तव्यात कसूर, अक्षम्य दुर्लक्ष आणि ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची हानी केल्याचा ठपका चौकशीअंती ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे गगनबावडा ग्रामपंचायत ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाईस पात्र असल्याचे सांगत विद्यमान सरपंच चव्हाण यांना पदावरून हटविण्याचे लेखी निर्देश जारी केले आहेत. शिवाय तत्कालीन ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभेदार यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)
कोणत्याही स्वरूपातील गैरव्यवहार केलेला नाही. घरकुल योजनेतील ११ महिने करारावर दिल्या जाणाऱ्या जागांबाबत पूर्वीच्या कार्यकारिणीच्या कालावधीतील प्रकरणे आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर दाद मागणार आहे.
- अंकिता चव्हाण, सरपंच, गगनबावडा