गडहिंग्लज विभाग दुष्काळी जाहीर करा
By Admin | Updated: August 22, 2015 01:00 IST2015-08-22T01:00:51+5:302015-08-22T01:00:51+5:30
संध्यादेवी कुपेकर : मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना पत्र; गडहिंग्लजमध्ये आढावा बैठक

गडहिंग्लज विभाग दुष्काळी जाहीर करा
गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीनही तालुक्यांत यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरिपाची सर्व पिके धोक्यात आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत भागातील सर्व धरण व तलावांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. गडहिंग्लजच्या पूर्वभागात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गडहिंग्लज विभागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी पाटबंधारे व कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी गडहिंग्लज उपविभागातील सद्य:स्थितीतील पीक-पाण्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्या पत्रकाराशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, येत्या ८-१५ दिवसांत पाऊस न पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून गडहिंग्लज विभागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहे. गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी २०० मि.मी. कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग, ऊस व बटाटा पिकांमध्ये प्रचंड घट होणार आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
पर्जन्यमान कमी आणि पिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, यामुळे खरिपाचा हंगाम वाया जाण्याची भीती आहे. हिरण्यकेशी, घटप्रभा आणि ताम्रपर्णी नद्यांच्या पातळीतही घट झाली आहे.
शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावीत, हलकर्णी भागातील शेतकऱ्यांना सर्व पिकांची नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्ज माफ व शेतसारा माफ करावा, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी, जनतेला रोजगार द्यावा, धरणे व तलावातील पाणी जनावरे व माणसाकरिता पिण्यासाठी राखून ठेवावे, हलकर्णी परिसरात जलयुक्त शिवार योजनेची कामे प्राधान्याने घ्यावीत, अशी मागणी आपण शासनाकडून करणार आहोत, असेही कुपेकर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील, उपसभापती तानाजी कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदयराव जोशी, जयसिंग चव्हाण, अमर चव्हाण, इकबाल काझी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)