हद्दवाढीनंतर गडहिंग्लजकर सरसावले रिंग रोडसाठी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:59+5:302021-02-05T07:01:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : एकजुटीच्या ताकदीवर हद्दवाढीला मंजुरी मिळवलेले गडहिंग्लजकर आता रखडलेल्या रिंग रोडच्या पूर्ततेसाठी एकत्र आले ...

Gadhinglajkar Saraswale for ring road after extension ..! | हद्दवाढीनंतर गडहिंग्लजकर सरसावले रिंग रोडसाठी..!

हद्दवाढीनंतर गडहिंग्लजकर सरसावले रिंग रोडसाठी..!

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : एकजुटीच्या ताकदीवर हद्दवाढीला मंजुरी मिळवलेले गडहिंग्लजकर आता रखडलेल्या रिंग रोडच्या पूर्ततेसाठी एकत्र आले आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीदेखील स्थापन केली आहे. गेल्या दोन दशकांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्यास संपूर्ण शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. गडहिंग्लज हे सीमाभागातील एक महत्त्वाचे शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी केंद्र आहे. गोवा आणि कोकणात जाणारा रस्ताही शहरातूनच गेला आहे. त्यामुळे वाढलेल्या रहदारीने शहरात दररोज वाहतुकीची कोंडी होते. आठवडा बाजाराच्या दिवशी रविवारी मुख्य मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद ठेवावी लागते. त्यावर रिंग रोड विकसित करणे हाच एकमेव उपाय आहे. रिंग रोडकरिता जमीन संपादन आणि रस्ते बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असल्यामुळेच हे काम रखडले आहे; परंतु संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईऐवजी ‘टीडीआर’चा पर्याय सहजपणे उपलब्ध करून देणे आणि रस्त्याच्या निधीसाठी

शासनाकडे पाठपुरावा केल्यास हा प्रश्नदेखील मार्गी लागायला वेळ लागणार नाही.

२००५ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने उर्वरित वैधानिक विकास महामंडळाकडून रिंग रोडसाठी ५६ लाखांचा निधी मिळाला होता. त्यातून व अन्य निधीतून नगरपालिकेने जवळपास अडीच किलोमीटरचे वळण रस्ते बांधले आहेत. उर्वरित रस्त्यांसाठी

लोकसहभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

-------

रखडलेला रिंग रोड असा -

हॉटेल साई प्लाझा ते मराठा चित्र मंदिर, मराठा चित्र मंदिर ते हॉटेल सूर्या, हॉटेल सूर्या ते एमएसईबी कार्यालय, एमएसईबी कार्यालय ते बेलबाग, बेलबाग ते लाखेनगर, लाखेनगर ते हॉटेल साई प्लाझापर्यंत संपूर्ण शहराच्या बाहेरून जाणारा हा रिंग रोड एकूण ७ किलोमीटरचा आहे. त्यासाठी सुमारे ३० कोटींची गरज आहे. ‘पीडब्ल्यूडी’कडे जबाबदारी द्या..! संकेश्वर -आंबोली व गारगोटी - नागणवाडी रस्त्यापैकी शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी गडहिंग्लज पालिकेकडे आणि रिंग रोडचा विकास व देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिल्यास हा प्रश्न सुटणे शक्य आहे. त्यादृष्टीनेही प्रयत्न करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया

रिंग रोडकरिता जमीन उपलब्ध करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे. त्यासाठी नगरपालिका व नगररचना विभागाने शेतकऱ्यांच्या दारात जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना ‘टीडीआर’ देण्यासाठी गडहिंग्लजमध्येच खास कॅम्पस भरवायला हवेत.

- डॉ. एम.एस. बेळगुद्री अध्यक्ष, हद्दवाढ कृती समिती

Web Title: Gadhinglajkar Saraswale for ring road after extension ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.