गडहिंग्लजला ‘महाआघाडी’चेच आव्हान !

By Admin | Updated: September 1, 2016 00:38 IST2016-08-31T23:52:16+5:302016-09-01T00:38:39+5:30

राष्ट्रवादीला वर्चस्वासाठी झगडावे लागणार : काँगे्रस, जनता दलाचा अस्तित्वासाठी संघर्ष, चव्हाण-शहापूरकरांच्या ‘भाजप’ प्रवेशाने राजकारणाला कलाटणी

Gadhinglaja challenge 'Mahaagadi'! | गडहिंग्लजला ‘महाआघाडी’चेच आव्हान !

गडहिंग्लजला ‘महाआघाडी’चेच आव्हान !

राम मगदूम -- गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीसमोर ‘महाआघाडी’चेच आव्हान कायम राहील. त्यामुळे राष्ट्रवादीला वर्चस्वासाठी, तर गटबाजीमुळे अस्तित्वहीन झालेल्या काँगे्रसला आणि ग्रामीण भागात प्रभावहीन ठरलेल्या जनता दलाला स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
गडहिंग्लज तालुक्याची चंदगड व कागल विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे. नूल, हलकर्णी, भडगाव व नेसरी हे चार जिल्हा
परिषद मतदारसंघ चंदगडमध्ये, तर कडगाव जि. प. मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर गतवेळी झालेल्या पहिल्या निवडणुकीतदेखील तालुक्यातील जि.प.च्या पाचही जागा आणि पंचायत समितीच्या १० पैकी
८ जागा जिंकून राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले होते.
राष्ट्रवादीने गतवेळी जि.प. व पं.स.ची निवडणूक तालुक्यात स्वतंत्रपणे लढविली होती. राष्ट्रवादीच्याविरोधात काँगे्रस, जनसुराज्य व जनता दल अशी दुरंगी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील काही जागा स्वबळावर लढविल्यामुळे काही ठिकाणी ही निवडणूक तिरंगी झाली होती. मात्र, त्यावेळीही राष्ट्रवादीनेच बाजी मारली होती.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे हे दोघेही अलीकडेच झालेल्या गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आले. त्यावेळी त्यांच्याविरोधात एकत्र आलेल्या चव्हाण आणि शहापूरकर यांच्या महाआघाडीलाही पालकमंत्री चंद्रकांतदादांच्या पाठबळामुळे बऱ्यापैकी यश मिळाले. त्यानंतर आता त्या दोघांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय
घेतला आहे. त्यामुळे भाजपला तालुक्यात ‘चेहरा’ आणि ‘बळ’ मिळाले आहे.
गतवेळी गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर आणि
प्रमुख कार्यकर्ते अप्पी पाटील या दोघांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवार संध्यादेवींना कडवे आव्हान
दिले होते. ते दोघेही या निवडणुकीतदेखील कारखाना पॅटर्ननुसार राष्ट्रवादीच्या विरोधातील महाआघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यावेळची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार आहे.

महाआघाडीचा प्रयोग
गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या विरोधात प्रकाश चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर गट आणि भाजप व शिवसेना एकत्र आले होते. त्याचवेळी राजकीय समीकरणांच्या बदलाची नांदी झाली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी चव्हाण व शहापूरकरांनी ‘भाजप’मध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या धर्तीवर पुन्हा ‘राष्ट्रवादी व जनता दला’च्या विरोधात ‘भाजप’कडून महाआघाडीचा प्रयोग होईल. कारखान्यासाठी स्वतंत्र लढलेली स्वाभिमानी संघटनादेखील त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

पं.स. मतदारसंघ (कंसात पक्ष)
नेसरी - हेमंत कोलेकर (‘जनसुराज्य’कडून निवडून आले आता ‘भाजप’मध्ये), बुगडीकट्टी - सरिता तानाजी पाटील (‘राष्ट्रवादी’कडून निवडून आलेल्या आता ‘शिवसेने’चे संग्रामसिंह कुपेकर समर्थक), कडगाव - मीनाताई सदानंद पाटील (राष्ट्रवादी), गिजवणे - स्नेहल शंकर गलगले (राष्ट्रवादी), भडगाव -अमर चव्हाण (राष्ट्रवादी), महागाव - रजनी विजय नाईक (‘राष्ट्रवादी’कडून निवडून आलेल्या आता अप्पी पाटील यांचे समर्थक), नूल - इकबाल काझी (राष्ट्रवादी), हसूरचंपू - तानाजी कांबळे (राष्ट्रवादी), हलकर्णी - अनुसया सुतार (राष्ट्रवादी), बसर्गे - बाळेश नाईक (जनता दल)

Web Title: Gadhinglaja challenge 'Mahaagadi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.