'गडहिंग्लज अर्बन'ची आर्थिक स्थिती भक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:46+5:302021-07-07T04:30:46+5:30
गडहिंग्लज : दि गडहिंग्लज अर्बन को-आॅप. बँकेची आर्थिक स्थिती पूर्वीप्रमाणेच उत्तम व भक्कम आहे. त्यामुळे कर्जदारांनी वेळेत हप्ते भरून ...

'गडहिंग्लज अर्बन'ची आर्थिक स्थिती भक्कम
गडहिंग्लज : दि गडहिंग्लज अर्बन को-आॅप. बँकेची आर्थिक स्थिती पूर्वीप्रमाणेच उत्तम व भक्कम आहे. त्यामुळे कर्जदारांनी वेळेत हप्ते भरून आणि ठेवीदारांनी आपल्या ठेवी न काढता गडहिंग्लज शहरासह तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या आपल्या बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ व बँकेचे मानद सल्लागार किरण कर्नाड यांनी मंगळवारी (६) केले.
बँकेचे सरव्यवस्थापक किरण तोडकर व गुंतवणूक सल्लागार रूपेश काळे यांच्या गैरव्यवहारामुळे बँकेला १३ कोटींचा फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर घोटाळ्यातील रक्कमेची वसुली, बँकेची सद्य:स्थिती व आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब घुगरे, उपाध्यक्ष दत्तात्रय बरगे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, ज्येष्ठ संचालक अरविंद कित्तूरकर, राजेंद्र तारळे उपस्थित होते.
कर्नाड म्हणाले, घोटाळ्यातील रक्कम ही नॉन-एसएलआर फंडातील असल्यामुळे बँकेच्या इतर निधींना कोणताही धक्का पोहचलेला नाही. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेले सर्व आर्थिक निकष बँक आजच्या घडीलादेखील पूर्ण करते. त्यामुळे गैरव्यवहाराची रक्कम पाच समान वार्षिक हप्त्यात विभागून देण्याची विनंती रिझर्व्ह बँकेला करण्यात आली आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल.
घुगरे म्हणाले, बेकायदेशीर गुंतवणूक रकमेसह बँकेचे अंतर्गत लेखापरीक्षण आणि नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाचे शासकीय लेखापरीक्षण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व शाखेत सभासद, ग्राहक, ठेवीदार व कर्जदार यांना बोलावून बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देणार आहोत.
काळे व तोडकर यांच्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. शासनाने दोघांचीही बँक खाती सील केली असून त्यांच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. घोटाळ्यातील रकमेच्या वसुलीसाठी त्यांच्याविरुद्ध लवकरच न्यायालयात वसुलीचा दावा दाखल केला जाईल, असेही घुगरे यांनी स्पष्ट केले.
चौकट :
थकीत कर्ज वसुलीसाठी अभियान
थकीत कर्ज वसुलीसाठी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांची खास पथके तयार करण्यात आली आहेत. कर्जदारांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास प्रसंगी गांधीगिरी आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे कठोर कारवाई करून कर्जाची वसुली केली जाईल, असेही घुगरे यांनी सांगितले.
फोटो ओळी : गडहिंग्लज अर्बन बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत मानद सल्लागार किरण कर्नाड यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब घुगरे, उपाध्यक्ष दत्ता बरगे, संचालक सतीश पाटील उपस्थित होते.
क्रमांक : ०६०७२०२१-गड-०६