गडहिंग्लजला पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डातच नातेवाइकांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:08+5:302021-05-23T04:25:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकीकडे पीपीई किट घातल्याशिवाय कोरोना रुग्णाजवळ जाऊ नये ...

Gadhinglaj is surrounded by relatives in the positive patient ward | गडहिंग्लजला पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डातच नातेवाइकांची वर्दळ

गडहिंग्लजला पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डातच नातेवाइकांची वर्दळ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एकीकडे पीपीई किट घातल्याशिवाय कोरोना रुग्णाजवळ जाऊ नये असे स्पष्ट केले असताना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाॅर्डामध्ये नातेवाइकांची सर्रास वर्दळ सुरू असल्याचे चित्र आहे. काही रुग्णांच्या नातेवाइकांनीच याबाबत थेट मुंबईपर्यंत तक्रारी केल्या असून, जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने याबाबत कडक धोरण राबविण्याची गरज आहे.

गडहिंग्लज येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांसाठी वरदान ठरले आहे. गेल्या वर्षीही कोरोनाकाळात या रुग्णालयाने उत्तम कामगिरी केली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या रुग्णालयात वेगळेच चित्र दिसून आले आहे. चक्क पॉझिटिव्ह रुग्णांजवळ नातेवाईक येऊन बसणे, घरातून डबा घेऊन येणे, रुग्णाचे जेवण झाले की डबा घेऊन घरी जाणे, वयस्कर रुग्णांजवळ गरज आहे म्हणून राहणे, तब्येत कशी आहे बघायला येणे अशा विविध कारणांनी वॉर्डातच नातेवाइकांची वर्दळ वाढल्याचा गंभीर प्रकार पाहावयास मिळत आहे.

नातेवाईकच कोणाचे ऐकत नसल्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी थेट प्रांताधिकाऱ्यांना पत्र लिहिले. प्रांताधिकाऱ्यांनीही पोलीस विभागाला पत्र लिहून या ठिकाणी बंदोबस्त मागवला. तरीही पोलिसांशी आणि रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी वाद घालून नातेवाईक पॉझिटिव्ह रुग्णांना भेटत आहेत.

चौकट

संसर्ग वाढण्याची भीती

या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी प्रांताधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नातेवाइकांच्या या वर्दळीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही नातेवाईक ऐकण्याच्या स्थितीत नाहीत, असे सांगण्यात येते.

चौकट

इचलकरंजीतही असाच प्रकार

इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयातही पॉझिटिव्ह रुग्णांना भेटण्यासाठी किंवा जेवण देण्यासाठी नातेवाईक ये-जा करतात, अशीही तक्रार करण्यात आली आहे. अशा वेळी अडवल्यास संबंधितांशी वाद होण्याचेही प्रकार वाढले आहेत.

चौकट

गडहिंग्लजसह अनेक तालुक्यांतील खासगी रुग्णालयांमध्येही पॉझिटिव्ह रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाइकांना परवानगी देण्यात येते. प्रत्येक वेळी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास हा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

चौकट

डॉक्टरही हवालदिल

नातेवाईक आणि रुग्णांच्या चौकशीसाठी येणाऱ्या फोनमुळे डॉक्टर आणि कर्मचारीही हवालदिल झाले आहेत. पूर्ण लक्ष उपचाराकडे देऊन रुग्ण बरा करण्यापेक्षा नेते, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोठ्या प्रमाणावर फोन सुरू असतात. अशातच नातेवाइकांच्या या वर्दळीमुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे.

चौकट

गेल्या १२ दिवसांत १०६१ रुग्ण

गडहिंग्लज तालुक्यात गेल्या १२ दिवसांत १०६१ कोरोनाचे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक घरी गेल्यानंतर जर काळजी घेत नसतील तर त्यांच्याकडून घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनाही कोरोनाची बाधा होऊ शकते, याची जाणीव नातेवाइकांनी ठेवण्याची गरज आहे.

Web Title: Gadhinglaj is surrounded by relatives in the positive patient ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.