गडहिंग्लजला यंदापासून फुटबॉल भूषण पुरस्कार

By Admin | Updated: June 4, 2016 00:35 IST2016-06-04T00:06:46+5:302016-06-04T00:35:03+5:30

गडहिंग्लज युनायटेड : राष्ट्रीय खेळाडूंचाही गौरव

Gadhinglaj received this year's Football Bhushan Award | गडहिंग्लजला यंदापासून फुटबॉल भूषण पुरस्कार

गडहिंग्लजला यंदापासून फुटबॉल भूषण पुरस्कार

गडहिंग्लज : हंगामात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा दरवर्षी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे गौरव केला जातो. यंदापासून यामध्ये ‘फुटबॉल भूषण’ हा अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘फुटबॉल’च्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक संघटना अथवा संघटकाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख पंधरा हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गडहिंग्लजला नऊ दशकांहूनही अधिक काळाची फुटबॉलची गौरवशाली परंपरा आहे. मोठे पुरस्कर्ते नसतानाही या छोट्या केंद्राने आंतरराज्य स्पर्धांची परंपरा गेल्या सहा दशकाहून अधिक काळ लोकवर्गणीतून जपली आहे. देशभरातील अशा अनेक केंद्रांचा भारतीय फुटबॉल टिकविण्यात सिंहाचा वाटा आहे. अशा केंद्रातील खेळाडू, प्रशिक्षक संघटना अथवा संघटकांना प्रोत्साहन ठेवण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी कोणाकडूनही अर्ज मागविण्यात येणार नाहीत. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पुरस्काराच्या निवडीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकातील संबंधितांचे फुटबॉल क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन निवड केली जाणार आहे.
गोव्याचे नामवंत प्रशिक्षक पीटर वॉलीस, कोलकाता ‘फुटबॉल’चे संपादक लालडू चक्रवर्ती, भारतीय संघाचे माजी कर्णधार रामन विजयन (तमिळनाडू), साईचे निदेशक गोपालन (बंगलोर), हिमाचल प्रदेश असो.चे सचिव दीपक शर्मा, सेनादल फुटबॉल प्रशिक्षक परशुराम सलवादी (दिल्ली), ज्येष्ठ प्रशिक्षक हरिहर मिश्रा (यवतमाळ) ‘विफा’चे सहसचिव किरण चौगुले यांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)

पुढील आठवड्यात वितरण
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील आठवड्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष सुनील चौगुले यांनी दिली. यावेळी स्थानिक खेळाडूसह जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचाही सत्कार केला जाणार आहे.

Web Title: Gadhinglaj received this year's Football Bhushan Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.