'गडहिंग्लज'मध्ये 'भाजप'ची पाटी पुन्हा कोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:06+5:302021-01-13T05:02:06+5:30

राम मगदूम। गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच २ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी शशीकला दयानंद पाटील यांनी वर्षापूर्वी ...

In 'Gadhinglaj', 'BJP's' board is empty again! | 'गडहिंग्लज'मध्ये 'भाजप'ची पाटी पुन्हा कोरी !

'गडहिंग्लज'मध्ये 'भाजप'ची पाटी पुन्हा कोरी !

राम मगदूम। गडहिंग्लज :

गडहिंग्लज नगरपालिकेच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच २ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी शशीकला दयानंद पाटील यांनी वर्षापूर्वी जनता दलात तर सोमवारी (११) दीपक कुराडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात भाजपची पाटी पुन्हा कोरी झाली.

गेल्यावेळी तत्कालीन सत्ताधारी जनता आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. त्यात 'जद'ला नगराध्यक्षपदासह ११, राष्ट्रवादीला ४, भाजपला २ तर शिवसेनेला १ जागा मिळाली होती. त्यानंतर वाढीव प्रभागाच्या निवडणुकीत जद व राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळाली.

दरम्यान, 'राष्ट्रवादी व जनता दल' एकत्र असतानाही विधानसभेच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे यांना गडहिंग्लज शहरात दुसऱ्या क्रमांकाची लक्षणीय मते मिळाली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पक्षबांधणीसाठी पायाला भिंगरी बांधली आहे. परंतु, त्यांच्याच कागल मतदारसंघातील गडहिंग्लज शहरातील संघटना बांधणीकडे त्यांचेही दुर्लक्ष झाले.

गडहिंग्लज शहराच्या विकासाला सहकार्य मिळेल याच आशेपोटी सत्ताधारी 'जद'ने तत्कालीन सरकार पक्षाचे नगरसेवक म्हणून युतीच्या नगरसेवकांना आघाडीत घेतले. एका समितीचे सभापतिपदही त्यांना दिले. परंतु, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादांनी पालिकेला राहू द्या, भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठीदेखील काडीची मदत केली नाही. त्याचाच हा परिपाक मानला जात आहे.

-----------------------------------

* घडले-बिघडले

गेल्या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रमेश रिंगणे यांना डावलून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या वसंत यमगेकर यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली, इथेच घोटाळा झाला. संधी चालून आली असतानाही भाजपाला पालिकेची सत्ता काबीज करता आली नाही. उमेदवारी डावलल्यामुळेच रिंगणेंनी भाजपला ‘बाय-बाय’ करून राष्ट्रवादीतर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यानंतर रिंगणेंनी पुन्हा भाजपामध्ये तर यमगेकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

-----------------------------------

* कुराडेंनी पक्ष का सोडला..?

किमान आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळावा म्हणून कुराडेंनी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही रुपयाचाही निधी मिळाला नाही. परंतु, आपली सत्ता नसतानाही मंत्री मुश्रीफ यांनी नगरपालिकेला १० कोटी आणि राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभागांतील कामांसाठी दीड कोटी दिले. त्याने प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे कुराडेंचे म्हणणे आहे.

-----------------------------------

* पंचायत समितीवरही पाणी..!

गडहिंग्लज पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच १० पैकी ३ जागा मिळालेल्या भाजपला पहिल्याच टप्यात सभापतिपद मिळाले होते. परंतु, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीतील बिघाडीमुळे पंचायत समितीच्या सत्तेवरही भाजपला पाणी सोडावे लागले.

-----------------------------------

फोटो ओळी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देऊन गडहिंग्लजचे भाजपचे नगरसेवक दीपक कुराडे यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.

क्रमांक : १२०१२०२१-गड-०८

Web Title: In 'Gadhinglaj', 'BJP's' board is empty again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.