कोरोना काळातही गडहिंग्लजने दिला ४९ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:42+5:302021-04-03T04:21:42+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील महावितरण विभागाने साडेचौदा कोटींचा महसूल जमा करून सर्व विभागांत आघाडी घेतली आहे. यासाठी गडहिंग्लज विभागात 'थकबाकीमुक्त'चे अभियानच ...

कोरोना काळातही गडहिंग्लजने दिला ४९ कोटींचा महसूल
गडहिंग्लज तालुक्यातील महावितरण विभागाने साडेचौदा कोटींचा महसूल जमा करून सर्व विभागांत आघाडी घेतली आहे. यासाठी गडहिंग्लज विभागात 'थकबाकीमुक्त'चे अभियानच राबविले जात आहे. याचा राज्याने आदर्श घेतला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाकडे होणाऱ्या खरेदी-विक्री दस्त नोंदणीमधून १३ कोटी; तर महसूल विभागाच्या गौण खनिज व शेतसाऱ्यामधून ७.५० कोटी वसुली झाली आहे. गडहिंग्लज नगरपालिकेनेही पाच कोटींचा महसूल गोळा करून ९० टक्के वसुली पूर्ण केली आहे.
ग्रामपंचायत विभागानेदेखील तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींकडील घरफाळा पाणीपट्टी कराच्या सात कोटींची वसुली केली आहे. यासह पाटबंधारे विभागानेही एक कोटीपर्यंत मजल मारली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे दहा महिने व्यापार, व्यवसाय बंद होते. या काळात अनेकांचे रोजगार गेले. अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा कठीण काळातही शासनाच्या विविध करांची रक्कम भरण्यात गडहिंग्लजकर आघाडीवर राहिले आहेत.
मार्चअखेर वसुली पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग झोकून कामाला लागतात. या वर्षी सर्वच विभागांपुढे वसुली पूर्ण होईल की नाही? हा प्रश्न राहिला होता. परंतु, नागरिकांनीच चांगला प्रतिसाद दिल्यामुळे विभागांना या कामी यश मिळाले.