गडहिंग्लजला राष्ट्रवादी अबाधित

By Admin | Updated: July 16, 2014 00:58 IST2014-07-16T00:45:44+5:302014-07-16T00:58:59+5:30

नगराध्यक्ष निवडी : पन्हाळ्यात जनसुराज्यमध्ये बंडाळी, बहुतांश निवडी बिनविरोध

Gadchaljal nationalist unrestricted | गडहिंग्लजला राष्ट्रवादी अबाधित

गडहिंग्लजला राष्ट्रवादी अबाधित

कोल्हापूर : गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या लक्ष्मी घुगरे, तर उपनगराध्यक्षपदी कावेरी चौगुले विजयी झाल्या. त्यांनी विरोधी उमेदवारांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. त्यामुळे गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या.
पन्हाळा नगराध्यक्षपदी मोकाशी, उपनगराध्यक्षपदी जमीर गारदी
पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. यापूर्वी आमदार विनय कोरे सांगतील तोच नगराध्यक्ष होत असे. मात्र, यावेळी पक्षाअंतर्गत बंडाळीचा फटका बसला. नगराध्यक्षपदासाठी जनसुराज्यच्यावतीने विजय पाटील यांनी, तर अपक्ष म्हणून असिफ मोकाशी, कमलाकर भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज, मंगळवारी विशेष सभेत कमलाकर भोसले, पद्मावती भोसले, संभाजी कोरे, कांबळे यांनी मोकाशी यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मोकाशी यांची नगराध्यक्षपदी, तर जमीर गारदी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी काम पाहिले.
दरम्यान, बहिरेवाडीचे सरपंच रवींद्र जाधव, विश्वास जाधव, संजय दळवी यांनी विजय पाटील व मोकाशी यांची समजूत काढली. त्यामुळे एक वर्षासाठी मोकाशी, तर दीड वर्षासाठी पाटील यांना नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला.
गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदी घुगरे, उपनगराध्यक्षपदी चौगुले
गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या लक्ष्मी घुगरे, तर उपनगराध्यक्षपदी कावेरी चौगुले विजयी झाल्या. या दोघींनाही प्रत्येकी दहा मते मिळाली, तर विरोधी आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेश बोरगावे व उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन देसाई यांना प्रत्येकी सात मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार हनुमंत पाटील यांनी काम पाहिले.
जनसुराज्यचे नरेंद्र भद्रापूर यांनी राष्ट्रवादीच्या घुगरे व चौगुले यांच्या बाजूने मत नोंदविले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शारदा आजरी, उदयराव जोशी, किरण कदम, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा. रमेश पाटील, गटनेते रामदास कुराडे, जि. प.च्या सदस्या शैलजा पाटील, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, आदी उपस्थित होते.
मलकापूरच्या नगराध्यक्षपदी पाटील, उपनगराध्यक्षपदी अमोल केसरकर
मलकापूर : मलकापूरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी-जनसुराज्य युतीचे नगरसेवक बाबासाहेब तातोबा पाटील, तर उपनगराध्यक्षपदी अमोल मधुकर केसरकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार ऋषिकेश शेळके होते.
शहर विकास आघाडीचे सुधाकर पाटील व शौकत कळेकर यांनी उमेदवारी माघार घेतली. त्यामुळे पाटील व केसरकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी आघाडीप्रमुख सर्जेराव पाटील, जनसुराज्यचे माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर, आघाडीप्रमुख प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते. सुयोग तानवडे यांनी आभार मानले.
जयसिंगपूर नगराध्यक्षपदी खामकर, अनुराधा आडके उपनगराध्यक्ष
जयसिंगपूर : येथील नगराध्यक्षपदी सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सुनीता आप्पासाहेब खामकर यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदी पुन्हा अनुराधा आडके यांना संधी देण्यात आली असून, त्यांचीही निवड बिनविरोध झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी हातकणंगलेचे तहसीलदार तथा पीठासन अधिकारी दीपक शिंदे होते.
यावेळी मुख्याधिकारी तानाजी नरळे, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, अस्लम फरास, राजेंद्र झेले, स्वरूपा पाटील-यड्रावकर, संगीता पाटील-कोथळीकर, संभाजी मोरे, आदी उपस्थित होते. बबन यादव यांनी आभार मानले.
मुरगूडच्या नगराध्यक्षपदी माया चौगले, दगडू शेणवी उपनगराध्यक्ष
मुरगूड : मुरगूड (ता. कागल)च्या नगराध्यक्षपदी माया सुनील चौगले यांची बिनविरोध निवड झाली, तर उपनगराध्यक्षपदी दगडू तुकाराम शेणवी यांची फेरनिवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्षस्थानी भुदरगडच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल होत्या.
प्रवीणसिंह पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, बांधकाम समितीचे सभापती अजितसिंह पाटील, शिवाजी इंदलकर, परेश चौगुले, आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष शेणवी यांनी आभार मानले.
कागलच्या नगराध्यक्षपदी माने, उषाताई सोनुले उपनगराध्यक्ष
कागल : कागलच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशाकाकी माने यांची, तर उपनगराध्यक्षपदी श्री शाहू आघाडीच्या उषाताई सदाशिव सोनुले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सांगडे यांनी काम पाहिले.
यावेळी भैया माने, मनोहर पाटील, प्रकाश गाडेकर, संजय कदम, कागल बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, अंजुम मुजावर, मारुती मदारे, शाहू कारखान्याचे संचालक बॉबी माने, बाळ पाटील, शिवाजीराव गाडेकर, शामराव पाटील, आदी उपस्थित होते. पक्षप्रतोद रमेश माळी यांनी स्वागत केले.
वडगाव नगराध्यक्षपदी विद्या पोळ,
मोहनलाल माळी उपनगराध्यक्ष
पेठवडगाव : वडगाव नगराध्यक्षपदी विद्या गुलाबराव पोळ, तर उपनगराध्यक्षपदी मोहनलाल माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोविंद सांगडे यांनी काम पाहिले.
यावेळी मोहनलाल माळी, राजू आवळे, सुनील हुकेरी, शिवराम जगदाळे यांची भाषणे झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव, विजयादेवी यादव, विश्रांत माने, राजकुमार पोळ, निर्मला सावर्डेकर, सुनीता पोळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी

Web Title: Gadchaljal nationalist unrestricted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.