सोनवडे-कोल्हापूर रस्त्याचे भवितव्य अधांतरी
By Admin | Updated: March 9, 2015 23:44 IST2015-03-09T23:03:13+5:302015-03-09T23:44:41+5:30
‘वन्यजीव’चा विरोध : काही भागात बफर झोन; तीन रस्ते असताना चौथा कशाला?

सोनवडे-कोल्हापूर रस्त्याचे भवितव्य अधांतरी
अनंत जाधव - सावंतवाडी -सोनवडे-कोल्हापूर घाटरस्त्याला वनविभागाने विरोध केल्याने या रस्त्याचे भवितव्य सध्यातरी अधांतरी आहे. सोनवडे ते शिवडाव हा घाट रस्ता पश्चिम घाटात येत असून, या रस्त्याचा काही भाग राधानगरी अभयारण्याच्या क्षेत्रात मोडत आहे. वन्यजीव विभागाने या भागाला यापूर्वीच बफर झोन जाहीर केले आहे. त्यामुळे या रस्त्याला विरोध करणारे पत्र वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक यांनी वनसचिवांना पाठवलेले आहे. कोल्हापूरला जोडणारे तीन रस्ते अस्तित्वात असताना चौथा रस्ता कशासाठी, असेही या पत्रात नमूद केले आहे.सोनवडे ते शिवडाव असा कोल्हापूर जोडणारा रस्ता झाल्यास सिंधुदुर्ग-कोल्हापूर अंतर अकरा किलोमीटरने कमी झाले असते. पाच वर्षांपूर्वी शिवडाव (जि. कोल्हापूर) येथे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा प्रारंंभ झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सोनवडेपर्यंत, तर कोल्हापूर जिल्ह्यातून शिवडावपर्यंत या रस्त्याचे कामही पूर्ण झाले. मात्र, साडेआठ किलोमीटरच्या घाट रस्त्याचे काम रखडले आहे. सिंधुदुर्गातून पावणेसहा किलोमीटर व कोल्हापूरमधून पावणेतीन किलोमीटर रस्त्याला वनक्षेत्र लागले
आहे, तर सिंधुदुर्गच्या काही भागात वनसंज्ञा आहे ाातून मार्ग काढण्यासाठी वनविभागाला नांदेड येथे पर्यायी जमीन देण्यात आली, पण पुन्हा एकदा वन्यजीव विभागाचा यक्षप्रश्न दोन्ही जिल्ह्यांच्या बांधकाम विभागांना डोकेदुखी ठरत आहे. हा अहवाल वन्यजीव विभाग कोल्हापूर व त्यानंतर मुख्य वन संरक्षक वन्यजीव नागपूर यांना सादर करण्यात आला. मात्र, एका महिन्यापूर्वी नागपूर वन्यजीव विभागाचे प्रधान वनसंरक्षक सर्जन भगत यांनी वन सचिव विकास खारगे यांना अहवाल सादर केला आहे. या अहवालात या रस्त्याला परवानगी देण्यास प्रधान वनसंरक्षक यांना सक्त विरोध केला आहे. पण जोपर्यंत हा रस्ता सर्व अटी शर्थी पूर्ण करून प्रत्यक्षात होत नाही. तोपर्यंत खर्ची करण्यात आलेला कोट्यवधी निधी वाया गेला, असे म्हणावे लागेल.
वन्यजीव विभागाचा आक्षेप
सोनवडे-कोल्हापूर या घाट रस्त्याचा काही भाग हा राधानगरी अभयारण्याच्या हद्दीत असून या ठिकाणी दुर्मीळ प्राणी आढळून आले आहेत. त्याशिवाय सोनवडे-शिवडाव हा रस्ता पश्चिम घाटात येतो आणि हा भाग पूर्वीच इको सेन्सिटिव्ह जाहीर केला.
वन्यजीव विभागाने घाट रस्त्याबाबत २०१२ मध्ये बांधकाम विभागाकडे आक्षेप नोंदवला होता. हा भाग बफर झोनमध्ये येत असल्याने येथे रस्ता करण्यास मनाई असल्याचे आक्षेपात म्हटले.
या समस्येवर मार्ग निघावा, यासाठी सिंधुदुर्ग व कोल्हापूर बांधकाम विभागाने संयुक्तपणे वन्यजीव अभ्यास व नागपूर येथील ‘इन्व्हरटेल’ या कंपनीकडून संपूर्ण अभ्यास करून घेतला. तसेच वन्यप्राण्यांना धोका उद्भवणार नाही. त्यांचा मार्ग कसा सुरक्षित राखला जाईल, असा अहवाल या कंपनीने दिला.
वन्यजीव विभागाचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. याबाबत आम्ही यापूर्वीच इन्व्हरटेल कंपनीचा अहवाल त्यांना सादर केला आहे, पण त्यात काही त्रुटी असतील तर पुन्हा पुन्हा प्रस्ताव पाठवून या समस्येतून मार्ग काढणार आहोत.
- छाया नाईक, कार्यकारी अभियंता, कणकवली