भावी सैनिक रस्त्यावर, भरतीचे लगेच उघडले दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:53+5:302021-09-18T04:24:53+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती सुरू करण्याच्या मागणीसाठी भावी सैनिक असलेली तरुणांची फौज शुक्रवारी रस्त्यावर ...

भावी सैनिक रस्त्यावर, भरतीचे लगेच उघडले दार
कोल्हापूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती सुरू करण्याच्या मागणीसाठी भावी सैनिक असलेली तरुणांची फौज शुक्रवारी रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच निघालेल्या या मोर्चाची दखल प्रशासनालाही तातडीनेे घ्यावी लागली. येत्या डिसेंबरपासून भरती सुरू करीत असल्याचे स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केल्यानंतर दोन वर्षांच्या या मोर्चाची यशस्वी सांगता झाली.
रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सैन्य भरतीसाठी तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा व्हिनस कॉर्नर असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी भरती सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अहवाल पाठविण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला. निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानंतर शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी प्रशासन भरतीसाठी सदैव तयार आहे, फक्त कोरोनामुळे ती घेता येत नव्हती. शिवाजी विद्यापीठाकडून कॅम्पस वापरण्यास देण्याबाबत परवानगी आल्यानंतर डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जाहीर केले.
जुन्या फॉर्मवरच भरती करा
५ मार्च २०२० ला ठरलेली भरती रद्द करण्यात आली होती. यासाठी १८ते २० फेब्रुवारीला फॉर्म भरुन घेण्यात आले होते, आता कर्नाटक सरकारच्या धर्तीवर कोल्हापुरातही जुन्या फाॅर्मवर भरती करावी, नाही तर या मुलांचे वय वाढून ते अपात्र ठरणार आहे. नवी भरती ऑनलाईन घ्यावी, अशी मागणी सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या पेठवडगाव येथील तरुण आकाश पाटील याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
घोषणा फलकांतून वेदना
सैन्य भरतीसाठी म्हणून पहिल्यांदाच निघालेल्या या मोर्चाचे सारथ्य हातात राष्ट्रध्वज घेऊन फाैजी ड्रेस परिधान करून एका तरुणाने केले. यावेळी तरुणांच्या हातातील घोषणांचे फलक लक्षवेधक आणि मुलांच्या वेदना दाखविणाऱ्या होत्या. न्याय आमचा झालाच पाहिजे भरतीचा दिवस आलाच पाहिजे, वय आमचं गेलं निघून कसं जगायचं वाट बघून, कोरोनाने घेतलाय सूड भरतीला केव्हा येणार मूड, तारीख जाहीर करा नाही तर थेट भरती करा, चला सगळे हात धरू सरकार एक विनंती करू, आई बाबाला सारखी वाटते खंत का पाहता पोराच्या जिवाचा अंत या घोषणा लक्षवेधक होत्या.
चौकट
संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा
सैन्य भरतीसाठी २१ वर्षे शेवटची मुदत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे भरती न झाल्याने सराव केलेली बरेच तरुण अपात्र ठरणार आहेत. त्यांना वय वाढवून देण्याबाबचा निर्णय संरक्षणमंत्रीच घेऊ शकतात. याबाबतीत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्रव्यवहार केला असून, जिल्हा प्रशासनाही पाठपुरावा करत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांनी सांगितले.
फोटो: स्वतंत्र देत आहे.