'गगनबावड्या'चे भवितव्य बुधवारी ठरणार
By Admin | Updated: May 4, 2015 00:54 IST2015-05-04T00:54:26+5:302015-05-04T00:54:26+5:30
उच्च न्यायालयात सुनावणी : संस्था गटातील ६६ पैकी २३ मतदान स्वतंत्र घेण्याचे आदेश

'गगनबावड्या'चे भवितव्य बुधवारी ठरणार
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्णात २६ केंद्रांवर मंगळवारी (दि. ५) मतदान होत आहे. गगनबावडा तालुक्यातील विकास संस्था गटातील ६६ पैकी २३ मतदान स्वतंत्र घ्या व उर्वरित मतांचीही मोजणी करू नये, असे आदेश न्यायालयाने दिल्याने या गटातील निकाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत बुधवारी सुनावणी होत आहे.
जिल्हा बँकेचे विविध गटांतील ७५१२ मतदार आहेत, २१ पैकी करवीर, राधानगरी, हातकणंगले, पन्हाळा तालुका विकास संस्थांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. १७ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत. २६ केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता मतदानाचे साहित्य केंद्रावर पोहोच केले जाईल. रमणमळा येथे मतमोजणीची व्यवस्था केली असून ३६ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे.
गगनबावडा तालुक्यात विकास संस्था गटात ६६ मतदार आहेत, पण उच्च न्यायालयाने यापैकी २३ मतदारांचे स्वतंत्र मतदान घ्यावे व उर्वरित ४३ मतदारांचे मतदान घेऊन मोजणी करावी पण निकाल घोषित करू नये, असे आदेश दिले आहेत.
तत्पूर्वी बुधवारी (दि. ६) याबाबत न्यायालयात सुनावणी आहे, यावेळी न्यायालय काय निकाल देते त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे डॉ. कदम यांनी सांगितले.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालाकडे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. यावेळी साहाय्यक निवडणूक अधिकारी अमित गराडे, नारायण परजणे, सुनील धायगुडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.(प्रतिनिधी)