अंगारा, भंडाराच ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T00:07:32+5:302015-07-25T01:13:30+5:30

मतदारांना शपथा : ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी

Future of Candidates, who will decide on Angara, Bhandara | अंगारा, भंडाराच ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

अंगारा, भंडाराच ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

गणपती कोळी - कुरूंदवाड  ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचे मतपरिवर्तन करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असून, दगाफटका होऊ नये म्हणून देवालाच साक्षीला घातले जात आहे. अंगारा, भंडारा, बुक्का, कुराणाची शपथ देत असल्याने देवाचे हे ‘भस्म’च उमेदवारांचे भवितव्य ठरवित आहे.सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत सत्तेतून तालुका व जिल्हा स्तरावर आपला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी गावागावांतील गटनेता आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी राजकीय शक्ती पणाला लावत आहे. तर विरोधी गट नेत्यांनेही तुल्यबळ उमेदवार देत आव्हान उभे केल्याने बहुतेक ग्रामपंचायतीत काट्याची लढत होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी व उमेदवारांसाठी राजकारणाची पहिली पायरी समजली जाते. राजकारणाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले हे सदस्यपद असले तरी आपल्याच प्रभागात विरोधी उमेदवाराचा पराभव करून आपले जनमत विरोधकांपुढे, आपल्या गट नेत्याला दाखविण्याच्या भावनेतून राजकीय ईर्षा पेटली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडून येण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता उमेदवारांनी ठेवल्याने अत्यंत चुरस निर्माण झाली आहे.
मर्यादित मतदारसंख्येचा प्रभाग असल्याने व एक, दोन मतातच अनेक उमेदवारांचा पराभव अथवा विजय होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, प्रचारापेक्षा मतपरिवर्तनाला अधिक महत्त्व दिले जात आहे. उमेदवार एखाद्या समाजप्रमुखाला, मंडळाच्या अध्यक्षाला गाठून आश्वासनाबरोबर इच्छांची पूर्तताही करीत आहे. इच्छापूर्ती करीत असताना गुप्त मतदान पद्धतीतून दगाफटका बसू नये, याची दक्षता घेत ज्या-त्या समाजाचे कुलदैवत, ग्रामदैवतांचा अंगारा, भंडारा, बुक्का, कुराण हातात घेऊन शपथ घेण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे उमेदवाराचा, गटनेत्यांचा मतदारावर विश्वास नसला तरी भंडारा, अंगाऱ्यावर विश्वास असून, उमेदवारांचे भवितव्य भंडारा, अंगाराच ठरवित आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने गावागावांत अंधश्रद्धाही तितकीच प्रभावी झाली असून, उमेदवार संकटावेळी देवालाच साक्षीला घालत आहे. त्यामुळे कोणता देव कोणाला प्रसन्न होतो, याचा फैसला निकालानंतरच होणार आहे.

Web Title: Future of Candidates, who will decide on Angara, Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.