धारवाड येथे कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: September 1, 2015 00:31 IST2015-09-01T00:31:39+5:302015-09-01T00:31:39+5:30

कर्नाटक विश्वविद्यालयाच्या मैदानातील रुद्रभूमीत शासकीय इतमामात कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral on Kalaburgi at Dharwad | धारवाड येथे कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार

धारवाड येथे कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार

बेळगाव : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्यावर धारवाड येथील धारवाड विश्व विद्यालयाच्या रुद्रभूमीत दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्य, कला, संस्कृती आणि इतर क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय, चाहते यांना अश्रू आवरणे कठीण झाले.
रविवारी सकाळी अज्ञातांनी कलबुर्गी यांच्या धारवाडमधील कल्याणनगर येथील त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या केली होती. सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून कलबुर्गी यांच्या अखेरच्या प्रवासाला प्रारंभ झाला. फुलांनी सुशोभित वाहनावर त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. अंत्ययात्रेत सहभागी झालेले त्यांचे चाहते कलबुर्गी यांच्या घोषणा देत होते. धारवाड शहरातील प्रमुख मार्गावर फिरून अंत्ययात्रा रुद्रभूमीत आली. कर्नाटक विश्वविद्यालयाच्या मैदानातील रुद्रभूमीत शासकीय इतमामात कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक पोलिसांनी हवेत ३ फैरी झाडून कलबुर्गी यांना आदरांजली वाहिली. यावेळी कर्नाटक राज्याच्या कन्नड आणि संस्कृती खात्याच्या मंत्री उमाश्री, लिंगायत समाजातील अनेक मठाधीश, कर्नाटक विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर, साहित्यिक बी. व्ही. विवेक राय, कला, संस्कृती, संशोधन, साहित्यिक, नाटककार क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि हजारो चाहते यावेळी उपस्थित होते. लिंगायत धर्माच्या वचन परंपरेनुसार कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आला असून, सीबीआयकडेदेखील हत्येचा तपास देण्याची तयारी असल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे.

कलबुर्गींची हत्या करून समतेचे विचार थांबविता येणार नाहीत. भाषेची मर्यादा ओलांडून कन्नड आणि मराठी भाषिक समतेचा विचार समाजात जनतेपर्यंत पोहोचवतील. जनतेत जाऊन कलबुर्गींचे विचार सांगणे हीच कलबुर्र्गींना खरी श्रद्धांजली ठरेल.
- धनाजी गुरव
(अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र )

Web Title: Funeral on Kalaburgi at Dharwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.