चरण येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:35+5:302020-12-13T04:39:35+5:30
चरण, ता. शाहूवाडी येथील वीर जवान अमित भगवान साळोखे पंचत्वात विलीन, सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

चरण येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चरण, ता. शाहूवाडी येथील वीर जवान अमित भगवान साळोखे पंचत्वात विलीन, सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमित यांची दोन वर्षाची लहान मुलगी आस्था हिने चितेला भडाग्नी दिला.
मध्य प्रदेश बालाघाट येथे गुरुवारी सायंकाळी वीर जवान अमित साळोखे यांचे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. मध्य प्रदेश येथून अमित यांचे पार्थिव सरकारी वाहनाने चरण या गावी आणण्यात आले, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी व लहान मुलगी बरोबर होती. गावी आल्यानंतर पत्नी, आई, वडील व बहीण यांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या वतीने अंत्ययात्रा काढण्यात आली. सात वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय राखीव दल बटालियनच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून जवानाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार, सीआरपीएफचे मेजर एम. एस. लॉरेन्स बागे, सुभेदार मेजर राजेंद्र राम , पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, करणसिंह गायकवाड, जि. प.चे बांधकाम समितीचे सभापती हंबीरराव पाटील, सभापती सुनीता पारळे, सरपंच वनश्री लाड, बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबा लाड, सुरेश पारळे, के. एन. लाड यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
फोटो 1 अमित साळुंखे यांच्या पार्थिवाला भडाग्नी देताना वडील भगवान साळुंखे यांच्यासोबत आस्था.
2. अमित त्यांचे पार्थिव पाहण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी.
3 फोटो अमित साळोखे.