गडसंवर्धनासाठी निधी वापरणार
By Admin | Updated: November 27, 2014 00:13 IST2014-11-26T23:35:25+5:302014-11-27T00:13:13+5:30
अमल महाडिक : ग्रामपंचायत, महाडिक गटाच्यावतीने सत्कार

गडसंवर्धनासाठी निधी वापरणार
शिरोली : कोल्हापुरातील ऐतिहासिक किल्ले व गडसंवर्धनासाठी आमदार निधी वापरणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी केले. ते शिरोली येथील ग्रामपंचायत व महाडिक गटाच्यावतीने आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभावेळी बोलत होते.
महाडिक म्हणाले, मला ज्यांनी निवडून दिले, त्या कोल्हापूरच्या जनतेला मी कधी विसरणार नाही. कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. पन्हाळा, विशाळगड, भुदरगड या किल्ल्याच्या संवर्धनासाठी व डागडुजीसाठी सर्वांत प्रथम निधी वापरणार आहे. कोल्हापूरची ओळख संपूर्ण जगभरात असलेल्या उद्योगांच्या वाढीसाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणणार आहे. तसेच सीपीआर, जिल्ह्यातील ग्रामपंचायती स्वावलंबन होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच बिस्मिल्ला महात, उपसरपंच राजू चौगुले व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते महाडिक यांना चांदीची तलवार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला सलिम महात, बबन संकपाळ, विजय जाधव, डॉ. सुभाष पाटील, बाबासाहेब कांबळे, दिलीप पाटील, शिवाजी खवरे, पंडित खवरे, प्रकाश कौंदाडे, ग्रामपंचायत सदस्य छाया चव्हाण, माधुरी जाधव, सागर कौंदाडे, गोविंद घाटगे, लीलाताई वंडकर, शिवाजी समुद्रे, जास्मिन गोलंदाज, डॉ. सोनाली पाटील, लियाकत गोलंदाज, संजय पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)