पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी निधी
By Admin | Updated: July 22, 2014 00:40 IST2014-07-22T00:25:32+5:302014-07-22T00:40:56+5:30
सतेज पाटील : प्रशासनाला सूचना; गुन्हेगारीला कायमचा पायबंद घाला

पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी निधी
कोल्हापूर : जिल्ह्यातील जबरी चोऱ्या, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांना कायमचा पायबंद बसण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सक्त सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. शासनाकडून मंजूर केलेल्या निधीतून नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतींबरोबरच पोलिसांच्या निवासस्थानांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
गुन्हे कमी होण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कोणती मोहीम सुरू केली पाहिजे, तसेच पोलिसांच्या वैयक्तिक काही अडचणींसंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या निधीतून राधानगरी, आजरा, शिरोळ, इचलकरंजी प्रशासकीय इमारत, राजारामपुरी, गगनबावडा, कागल, जयसिंगपूर, शाहूवाडी पोलीस उपअधीक्षक प्रशासकीय इमारत, जोतिबा, आदी पोलीस ठाण्यांचे काम पूर्ण झाले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याची इमारत ही हेरिटेजमध्ये येत असल्याने तिचे बांधकाम थांबले होते. परंतु, ही इमारत हेरिटेजमध्ये नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी इचलकरंजीमधील १०४ निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, ती दुरुस्त करण्याची गरज आहे. तसेच भुदरगड येथे प्रशासकीय इमारतीची आवश्यकता असल्याचे कळविले आहे. यासाठी निधी देऊ, असेही पाटील यांनी सांगितले.
चौका-चौकांत सीसीटीव्ही
शहरात वाहतुकीची वाढती कोंडी, गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी चौका-चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेला मंजूर केलेल्या दोन कोटी निधीतील एक कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
‘वॉटस् अॅप’चा वापर
समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून विचित्र मॅसेज पाठवून जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा घटनांना चाप लावण्यासाठी पोलिसांच्यावतीने ‘वॉटस् अॅप’ सुरू करण्यात येणार आहे. चुकीचा मॅसेज आल्यास तो त्वरित पोलिसांच्या ‘वॉटस् अॅप’वर सेव्ह करावा.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना बक्षीस
रस्ते अपघातामध्ये जखमी व्यक्तींना तत्काळ मदत पुरविणाऱ्या सामाजिक संस्था किंवा व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन बक्षिसेही देण्यात येणार आहेत. ५० हजार, एक लाख, दीड लाख, असे बक्षिसाचे स्वरूप आहे.