दिव्यांगांसाठीचा निधी सोयी-सुविधांसाठी वापरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:15+5:302021-01-22T04:22:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दिव्यांग कल्याणार्थ योजना हा महत्त्वाचा विषय असून त्यासाठीचा ५ टक्के निधी खर्चासाठी शासननिर्णयानुसार अंमलबजावणी ...

दिव्यांगांसाठीचा निधी सोयी-सुविधांसाठी वापरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दिव्यांग कल्याणार्थ योजना हा महत्त्वाचा विषय असून त्यासाठीचा ५ टक्के निधी खर्चासाठी शासननिर्णयानुसार अंमलबजावणी करावी, दिव्यांगांसाठी रॅम्प, स्वच्छतागृहे दुरूस्तीबाबत प्राधान्य द्यावे. सर्व शाळांमध्ये रॅम्प आहेत का, असतील तर ते निकषांनुसार आहेत का याबाबतचा सविस्तर अहवाल शिक्षण विभागाने द्यावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिव्यांग कल्याणार्थ योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दिव्यांग निधीबाबत शासननिर्णय आणि त्याबाबतचे पत्र सर्व नगरपालिका, मुख्याधिकाऱ्यांना पाठवावेत. वैश्विक ओळखपत्र देण्याबाबत आरोग्य विभागाने सुरुवात करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, वैश्विक ओळखपत्रासाठी १८ हजार ४५६ जणांची नोंदणी झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबत ग्रामीण रुग्णालय स्तरावर शिबीर घेवून निकालात काढावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. सर्व नगरपालिकांनी ५ टक्के निधी खर्चाबाबत जिल्हास्तरीय समितीकडून मंजुरी घ्यावी अन्यथा वित्तीय अनियमितता होण्याची शक्यता आहे.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बरगे, पन्हाळ्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, सदस्य अतुल जोशी, दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्वाती गोखले, राज्य परिवहन मंडळाचे पर्यवेक्षक विजय भंडारे उपस्थित होते.
--
फोटो नं २१०१२०२१-कोल-दिव्यांग निधी बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या दिव्यांग कल्याणार्थ योजनेच्या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.
--