गडहिंग्लजच्या भुयारी वीज वाहिन्यांसाठी निधी द्या

By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-27T23:58:48+5:302015-05-28T00:58:53+5:30

नगराध्यक्षांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन : सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रमुख चार मार्गांवर भुयारी वीजवाहिन्यांची गरज

Funding for the powerhouse of groundhunglz | गडहिंग्लजच्या भुयारी वीज वाहिन्यांसाठी निधी द्या

गडहिंग्लजच्या भुयारी वीज वाहिन्यांसाठी निधी द्या

गडहिंग्लज : सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गडहिंग्लज शहरातील प्रमुख चार मार्गांवर भुयारी वीजवाहिन्या टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
ऊर्जामंत्री बावनकुळे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. नगराध्यक्षा घुगरे यांनी ऊर्जा खात्याशी संबंधित अडी-अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी मंत्र्यांनी गडहिंग्लज पालिकेस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरात संकेश्वर रोड, आजरा रोड, कडगाव रोड व भडगाव रोड हे चार प्रमुख मार्ग आहेत. गडहिंग्लज परिसरात ७ साखर कारखाने आहेत. त्याशिवाय बाहेरील अन्य कारखान्यांनाही येथील ऊस जातो. त्यामुळे मुख्य मार्गावर ऊस वाहतूक व इतर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मुख्य मार्गावरील रस्त्यालगतचे खांब रस्ता रूंदीकरणासाठी अडथळ्यांचे व धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे अपघाताच्या काही घटनाही घडल्या आहेत. त्यासाठी धोकादायक खांब अन्यत्र हलविणे आणि भुयारी विद्युत वाहिनी टाकण्याची गरज आहे.
वाढत्या विस्तारामुळे शहरात अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी पथदिवे व वीजवाहिन्यांचा खर्च आजअखेर पालिकेनेच केला आहे. मात्र, उत्पन्न व गरजा लक्षात घेता हा खर्च पालिकेला झेपेनासा झाला आहे. त्यामुळे यापुढे नवे विद्युत खांबासाठीचा खर्च महावितरण कंपनीने करावा.
शहराच्या नळपाणी योजनेसाठी बसविण्यात आलेले वीजपंप, बगीच्यांना पाणी देण्यासाठी वापरले जाणारे पंप आणि सांडपाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपासाठीची वीजबिल आकारणी कमर्शियल व औद्योगिक पद्धतीने केली जाते. त्याचा पालिकेवर मोठा बोजा पडत आहे. त्यासाठी त्याची आकारणी सवलतीच्या दराने करण्यात यावी, अशी मागणीही नगराध्यक्षांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी युवराज बरगे, विद्युत निरीक्षक सूरज कुंभार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Funding for the powerhouse of groundhunglz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.