सांगरुळच्या ऐतिहासिक बंधाऱ्यासाठी निधी मंजूर-‘लोकमत’चा पाठपुरावा
By Admin | Updated: August 27, 2014 23:23 IST2014-08-27T22:41:55+5:302014-08-27T23:23:44+5:30
१०.७२ लाख मंजूर : कोेगे खडक, कळे, तिरपण बंधारा दुरुस्तीसाठी निधी

सांगरुळच्या ऐतिहासिक बंधाऱ्यासाठी निधी मंजूर-‘लोकमत’चा पाठपुरावा
सांगरुळ : करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील ऐतिहासिक बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने १० लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबरोबरच कोगे खडक, पन्हाळा तालुक्यातील कळे, तिरपण बंधाऱ्यांच्या डागडुजीसाठीही निधी मंजूर झाला.
सांगरुळ परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जून १९५० मध्ये सांगरुळ धरण संस्थेची स्थापना करत कुंभी नदीवर देशातील पहिला सहकार तत्त्वावरील बंधारा बांधला. हा बंधारा पाहूनच ‘केटी वेअर’ (कोल्हापूर टाईप बंधारा) बंधारे संपूर्ण देशात बांधले गेले. हा बंधारा बांधून ६५ वर्षे झाल्याने त्याची पडझड सुरू झाली होती. अनेक पिलर कोसळले आहेत. या बंधाऱ्यावरून वाहतूक नसली तरी यामध्ये पाणी आडवून सांगरुळपासून मरळीपर्यंतच्या सात गावांतील एक हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होतो. पिलर कोसळल्याने बरगे बसत नाहीत. परिणामी, उन्हाळ्यात पाणी वाहून जाते. वयोमान झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा ढासळण्याची भीती होती. त्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी गेली अनेक वर्षे शासनदरबारी प्रयत्न सुरू होते. सांगरुळ धरण संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष उत्तम कासोटे, सचिव बळिराम साळोखे व संचालक मंडळाने कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मंत्री मुश्रीफ यांनी तत्काळ बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १० लाख ७२ हजार रुपये मंजूर केले. त्याचबरोबर या संस्थेच्या कोगे खडक धरणाच्या दुरुस्तीसाठी दहा लाख निधी दिला. तसेच पन्हाळा तालुक्यातील कळे बंधाऱ्यासाठी पाच लाख, तर तिरपण बंधाऱ्यासाठी आठ लाख रुपये मंजूर केले आहेत.
‘लोकमत’चा पाठपुरावा
‘सांगरुळचा ऐतिहासिक ठेवा ढासळतोय!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने आवाज उठवत पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने यासाठी निधी दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश मिळाल्याने परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे. यासाठी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील यांच्यासह पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी बी. एस. घुणकीकर, शाखाधिकारी एस. डी. काटे, बी. एस. जाधव यांचे मोठे सहकार्य मिळाले.
- उत्तम कासोटे
(उपाध्यक्ष, सांगरुळ धरण संस्था)
गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश मिळाल्याने परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे. यासाठी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील यांच्यासह पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी बी. एस. घुणकीकर, शाखाधिकारी एस. डी. काटे, बी. एस. जाधव यांचे मोठे सहकार्य मिळाले.
- उत्तम कासोटे
(उपाध्यक्ष, सांगरुळ धरण संस्था)