शिवाजी विद्यापीठाला गुरूच्या सन्मानार्थ व्याख्यानमालेसाठी निधी
By Admin | Updated: July 13, 2015 00:45 IST2015-07-13T00:42:33+5:302015-07-13T00:45:27+5:30
अंबुजा साळगांवकर यांची गुरुदक्षिणा : एम. एस. प्रसाद यांच्या नावासाठी कुलगुरुंकडे दोन लाखांचा धनादेश सुपूर्द

शिवाजी विद्यापीठाला गुरूच्या सन्मानार्थ व्याख्यानमालेसाठी निधी
कोल्हापूर : सुमारे २५ वर्षांपूर्वी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. एम. एस. प्रसाद यांनी दूरदृष्टीने शिवाजी विद्यापीठात संगणकशास्त्र शिक्षणाचे बीज रोवले. त्यांच्या विद्यार्थिनी असलेल्या डॉ. अंबुजा साळगांवकर यांनी आपल्या गुरूच्या सन्मानार्थ संगणकशास्त्र अधिविभागात कायमस्वरूपी व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी दोन लाख दहा हजार रुपयांच्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला.
डॉ. साळगांवकर या विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागात पूर्णवेळ नियुक्त झालेल्या पहिल्या अधिव्याख्यात्या तसेच विभागाच्या पहिल्या पीएच.डी.धारक असून, सध्या मुंबई विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. साळगांवकर यांच्या प्रामाणिक भावनांचे आपण स्वागत करत असून, त्यांचे हे कार्य अत्यंत आदर्शवत आहे. व्याख्यानमाला माजी विद्यार्थ्यांना विविध नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन विद्यापीठाच्या समृद्धीसाठी पुढे येण्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. यावेळी सांख्यिकी अधिविभाग प्रमुख प्रा. डी. टी. शिर्के, संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. आर. के. कामत उपस्थित होते. विद्यापीठाच्या इतिहासात माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून शिक्षकाच्या सन्मानार्थ व्याख्यानमाला सुरू होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
प्रा. प्रसाद सरांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरात संगणक शिक्षणाचा प्रसार झाला. १५ आॅगस्टला प्रा. प्रसाद यांचा वाढदिवस असतो. त्याचे औचित्य साधून दरवर्षी आॅगस्टमध्ये संगणकशास्त्र अधिविभागात संगणकशास्त्रविषयक व्याख्यान आयोजित केले जावे. ट्युरिंग अॅवॉर्ड हे संगणक शास्त्रातील नोबेल प्राईज मानले जाते. या वक्त्याने एका ट्युरिंग पुरस्कार विजेत्याचे कार्य यांची ओळख आपल्या व्याख्यानातून करून द्यावी, अशी अपेक्षा आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटनपर पहिले पुष्प मुंबईतील शास्त्रज्ञ प्रा. विवेक पाटकर गुंफणार आहेत. असाच उपक्रम आयआयटी कानपूरमध्ये प्रा. सहस्त्रबुद्धे यांच्या सन्मानार्थ डॉ. नारायण मूर्ती यांच्या योगदानातून सुरू आहे. त्यातून प्रेरणा मिळाली.
- डॉ. अंबुजा साळगांवकर