म्हैसाळ, ताकारीला एआयबीपीतून निधी
By Admin | Updated: April 2, 2016 00:08 IST2016-04-01T23:21:16+5:302016-04-02T00:08:38+5:30
संजयकाका पाटील : सांगली-कोल्हापूर रस्त्याला टोल लागणार नाही

म्हैसाळ, ताकारीला एआयबीपीतून निधी
सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ व ताकारी सिंचन योजनेला वेगवर्धित सिंचन योजनेतून (एआयबीपी) निधी मिळणार असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम दर्जाहिन झाले असल्याने या रस्त्याला टोल लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खा. पाटील म्हणाले की, केंद्र शासनाने एआयबीपी योजना बंद केलेली नाही. या योजनेतून म्हैसाळ व ताकारी योजनेच्या निधीचा प्रस्ताव दिला होता. त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. टेंभू योजनेचे पाणी नागज (ता. कवठेमहांकाळ) ओढ्यात सोडले जाणार आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत पाणी ओढ्यात येईल. त्यामुळे नागज परिसरातील १७ गावांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगली - कोल्हापूर रस्त्याच्या टोलबाबत पाटील म्हणाले की, या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांवर टोलचे भूत बसणार नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत योग्यवेळी निर्णय होईल. गेल्या वर्षभरात शासकीय निधी व खासदार विकास निधीतून जिल्ह्यात कोट्यवधीची कामे मंजूर झाली आहेत. बेदाणा, हळद, गूळ, मिरचीवरील व्हॅट रद्द करण्यात यश आले. मालेगाव-मनमाड-दौंड हा मार्ग मिरजेतून बेळगावला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रियेची काम सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्ग मिरजेतून जाणार आहे. त्यासाठी मिरजेत उड्डाणपुलाचा प्रस्ताव दिला आहे. पर्यटन विभागातून शुकाचार्य, औदुंबर, सागरेश्वर, हरिपूर, महांकाली देवस्थानसाठी ३ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद घोटाळ्याची चौकशी
जिल्हा परिषदेच्या विविध विभागात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या घोटाळ्यातील दोषींची चौकशी होऊन कारवाई होणार आहे, असे सांगत जिल्हा परिषदेला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरच नियुक्त केला जाईल. विधिमंडळ अधिवेशनानंतर सीईओ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.