‘धमाल गल्ली’ची मजा लुटा महावीर उद्यानात
By Admin | Updated: May 8, 2015 00:14 IST2015-05-07T23:48:26+5:302015-05-08T00:14:54+5:30
साडेदहा वाजता प्रारंभ : पारंपरिक खेळांसह विविध उपक्रमांच्या सादरीकरणाची संधी

‘धमाल गल्ली’ची मजा लुटा महावीर उद्यानात
कोल्हापूर : लहानांसह पालकांच्याही बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांना त्या विश्वाचा आनंद देण्यासाठी ‘लोकमत’ने पुन्हा या रविवारी (दि. १०) ‘धमाल गल्ली’चे आयोजन केले आहे. नागाळा पार्क येथील महावीर उद्यानात सकाळी साडेसहा वाजता हा उपक्रम होईल. सिमेंटच्या जंगलामुळे आणि मोबाईलमुळे लहान मुले पारंंपरिक व शरीराला व्यायाम देणारे खेळ विसरून गेले आहेत. त्यात मोठी मंडळी अर्थात पालक मंडळींनाही लहानांसारखे खेळावेसे वाटते पण कुठे खेळायचे, इतर लोक काय म्हणतील, असा सवाल पडतो. याकरीता ‘लोकमत’ने लहानांसह मोठ्यांनाही सहभागी होऊन मन मानेल तसा कोणताही खेळ खेळता येईल, असा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध केला आहे. फक्त या प्लॅटफॉर्मवर येण्याचे काम बालकांसह पालकांचे आहे. निमित्त आहे महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे आयोजित केलेल्या ‘धमाल गल्ली’चे.
या गल्लीत लहानांबरोबर मोठ्या पालकांनाही त्यांच्या इच्छेनुसार कोणताही खेळ खेळता येणार आहे. त्यात अगदी काचेच्या गोट्या, रस्सीखेच, विटी-दांडू, बॅडमिंटन, बॅटबॉल, स्केटिंग, मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वत:हून त्यात सहभागी होऊन गाणे गाता येईल. त्याचबरोबर ज्यांना काहीच आपले कलागुण स्टेजवर सादर करताना भीती वाटते. त्यांना या ‘धमाल गल्ली’त आपली कला सादर करण्यासाठी छोटे स्टेजही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर रांगोळी काढताही येईल व अनुभवी रांगोळीकारांकडून रांगोळी कशी काढायची हे शिकता येईल. याशिवाय स्केटिंगचे तंत्रशुद्ध धडेही आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षकांकडून शिकताही येतील.
मर्दानी खेळांतील बारकावेही लहानांसह मोठ्यांनाही शिकता येतील. याकरीता प्राचीन युद्धकला विशारद मंडळीही या ‘धमाल गल्ली’त आपली कला सादर करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या कलेच्या प्रात्यक्षिकांबरोबरच लाठीकाठी व तलवारबाजी आणि मुलींना आपले संरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षणही देणार आहेत.