साईक्स एक्स्टेंशन येथे ‘फुल्ल टू धमाल’
By Admin | Updated: May 25, 2015 00:24 IST2015-05-24T23:51:13+5:302015-05-25T00:24:10+5:30
लोकमत धमाल गल्ली : साडेतीन तास रंगले खेळ; आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

साईक्स एक्स्टेंशन येथे ‘फुल्ल टू धमाल’
कोल्हापूर : दैनंदिन कामकाजाच्या पलीकडे जाऊन थोडा वेळ मनासारखे जगण्याची संधी आबालवृद्धांना मिळण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’द्वारे साईक्स एक्स्टेंशन रोडवर रविवारी आयोजित ‘धमाल गल्ली’ कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे यावेळीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये आबालवृद्धांनी ‘फुल्ल टू धमाल’ केली.या धमाल गल्लीचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. एस. के. रोलर स्केटिंगचे सुहास कारेकर, सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे, पारंपरिक खेळाच्या वनिता ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एरव्ही अभ्यासासाठी लवकर न उठणारी बच्चे कंपनी आपल्या कॉलनीतील धमाल गल्लीची चाहूल लागताच लगबगीने उठून या उपक्रमात सहभागी होत होती. सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच कोल्हापूरकर या ठिकाणी येत होते. सात वाजता ‘धमाल गल्ली’स सुरुवात झाली.
बच्चे कंपनी आजी-आजोबा आणि आई-बाबांचा हात धरून आधीच साईक्स एक्स्टेंशन येथे पोहोचली होती. उद्घाटनानंतर स्केटिंग प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्या स्केटिंगच्या मुलांनी स्केटिंगची विविध प्रात्यक्षिके करीत कार्यक्रमास सुरुवात केली. यात चार वर्षांच्या वेदांत पाटील व उत्कर्ष बेलवलकर यांच्यासह राष्ट्रीय, आंतरशालेय स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावणाऱ्या श्रुती कुलकर्णी हिने प्रात्यक्षिके दाखवीत उपस्थितांची वाहवा मिळविली. शंभुराजे मर्दानी खेळांच्या आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये मानसी व सुहानी मोरे यांनी तर दांडपट्टा आणि लाठीकाठी एकत्रित चालवून नेत्रदीपक प्रात्यक्षिक करून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना खिळवून ठेवले.
यामध्ये आखाड्याच्या गणेश बदाले, मयूर पाटील, प्रणव खंडागळे, आयुष रायकर, ओंकार पाटील या मावळ्यांनी दांडपट्टा, लाठीकाठी अशी शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. तर एका बाजूला गौरी इंगळे हिने लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून सर्वांना एकाच जागी स्तब्ध करून ठेवले होते. पाठोपाठ पोत्यामध्ये पाय घालून उड्या मारण्याच्या पारंपरिक खेळाने तर धमाल उडवून दिली. नवोदित चित्रकार विपुल हळदणकर यांनी ‘इलस्ट्रेशन’ या प्रकारातून धमाल गल्लीचे हुबेहूब चित्र रेखाटले.
दरम्यान, स्टेजवर श्रुती शेडगेने सादर केलेल्या ‘नटरंग’मधील ‘वाजले की बारा...’ या लावणीने सर्वांनाच डोलावयास भाग पाडले. मराठमोळी वेशभूषा परिधान करून तिने तर एकापाठोपाठ अनेक लावणी नृत्ये सादर करून उपस्थितांची शिट्ट्या व टाळ्यांची उत्स्फूर्त दाद घेतली. यापाठोपाठ मदन बागल, कृष्णात शिंदे, अनुराधा व अक्षय, कुबेर शेंडगे, पे्ररणा शेंडगे यांनी तर आपल्या नृत्य व गाण्यांच्या सादरीकरणामुळे क्षणक्षणाला धमाल उडवून दिली. सार्थक क्रिएशनच्या गु्रपने एकापेक्षा एक नृत्ये सादर करीत धमाल गल्लीला एक वेगळीच रंगत आणली.
दुसऱ्या बाजूला दोरी ओढण्याच्या स्पर्धेने तर आबालवृद्धांना पोट धरून हसविण्यास भाग पाडले. याप्रसंगी ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे आमच्या बालपणाची आठवण करून दिल्याची बोलकी प्रतिक्रिया सहभागी अनेकजणांनी व्यक्त केली.
‘लोकमत धमाल गल्ली’ या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम रेपे व अक्षय डोंगरे यांनी केले; तर
‘यूथ फॉर हेल्थ’चा ग्रुप विविध उपक्रम राबवीत सहभागी झाला होता. (प्रतिनिधी)
चिंचोके, काचेच्या गोट्या आणि बिट्ट्यांचा डाव रंगला
साईक्स एक्स्टेंशनसारख्या उच्चभू्र वसाहतीत आजच्या धमाल गल्लीत महिलांनी अगदी रस्त्यावर ठाण मांडत बिट्ट्यांचा डाव मांडला होता. या डावात हौसाबाई वंदुरे-पाटील, सुमन बागल, सीमा पाटील, उल्का चौगुले, डॉ. रंजना तोडकर, डॉ. अरुणा भिडे या सहभागी झाल्या होत्या. हा डाव कसा खेळतात, याची उत्सुकता म्हणून अनेक महिला तो खेळ कसा खेळतात, याची माहिती करून घेत होत्या. याच दरम्यान, बच्चे कंपनीने चिंचोके आणि काचेच्या गोट्यांचा खेळण्याचा डाव मांडला होता.
मने जिंकली...
शिरोली दुमाला येथील
ॐ डान्स ग्रुपने ‘शिवशंभो’ या गाण्यावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. यामध्ये विवेकानंद शेटे, अमोल कुबडे, श्रीया वलटे, योगिता रानगे, अंजली रानगे, श्रद्धा मेटील, शैलजा मेटील, राजनंदी पाटील सहभागी झाले होते.
श्रृती शेंडगे हिच्या लावणीने तर उपस्थितांना आपल्याबरोबर ठेका धरायला लावला.
‘धमाल गल्ली’त ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांनी समोरील घराचे हुबेहूब चित्र साकारून आपलाही सहभाग नोंदवला.
दिवाळी आणि मे महिन्याच्या सुटीत ‘धमाल गल्ली’ची संकल्पना कायमस्वरूपी राबवावी. या उपक्रमामुळे मुलांवर चांगले संस्कार होतात. त्याचबरोबर आतापर्यंत न पाहिलेले खेळ मुलांना खेळावयास मिळतात.
- पूनम डोमणे, कोल्हापूर
बुधवार पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी पेठ, पंचगंगा नदीकिनारी ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘धमाल गल्ली’ व्हावी. जेणेकरून कोल्हापूरचा मूळ गाभा असणाऱ्या कोल्हापूरकरांना या ‘धमाल गल्ली’ची मजा लुटता येईल.
- नानासाो तावदरे, कोल्हापूर
पारंपरिक खेळांबरोबर नृत्य, पोत्यामध्ये पाय घालून खेळण्याचा खेळ, चिंचोके, काचेच्या गोट्या, आदींमुळे मुलांना खेळांची माहिती होत आहे. या उपक्रमाने पालकांना बालपणीच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत.
- सीमा पाटील, कोल्हापूर