घराची स्वप्नपूर्ती... आजी म्हणाली तुमचे उपकार विसरू कशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:10+5:302021-09-19T04:24:10+5:30
उचगाव : पावसाळ्यात घर पडल्याने उघड्यावर संसार थाटलेल्या उजळाईवाडीतील मंगल कानडे या आजीला विश्वराज महाडिक यांनी घर बांधून देत ...

घराची स्वप्नपूर्ती... आजी म्हणाली तुमचे उपकार विसरू कशी
उचगाव : पावसाळ्यात घर पडल्याने उघड्यावर संसार थाटलेल्या उजळाईवाडीतील मंगल कानडे या आजीला विश्वराज महाडिक यांनी घर बांधून देत त्यांना कायमचा निवारा दिला आहे. घरकुल योजनेतून घर मिळेल, या आशेवर दिवस ढकलणाऱ्या या आजीला विश्वराज यांनी हक्काचे छप्पर दिल्याने मनोमन सुखावलेल्या आजीने महाडिक यांचे उपकार कधीच विसरू शकत नसल्याची भावना व्यक्त केली. मंगल कानडे या निराधार वृद्ध महिलेचे घर मुसळधार पावसात काेसळले होते. त्यामुळे उघड्यावर दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. ‘लोकमत’ने ‘निसर्गाने झोपडी पाडली, ग्रामपंचायत हक्काचे घर देईना’ या मथळ्याखाली २२ ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक दातृत्वाचे हात या आजीच्या मदतीसाठी धावले होते. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांनी या आजीची भेट घेत, त्यांना आहे त्या घराचे रूपडे पालटून देतो, असा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी एक लाख रुपये खर्चून पडलेल्या भिंती सिमेंट, विटांतून बांधून दिल्या. तसेच घरावर पत्रे टाकून देत आजीला कायमचे छप्पर दिले. शनिवारी कृष्णराज महाडिक व विश्वराज महाडिक यांनी या घराच्या चाव्या आजीकडे दिल्या. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी अमोल कानडे, राजेंद्र कानडे या दोघा भावांना खासगी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
कोट : ‘लोकमत’ने मंगल कानडे यांची व्यथा मांडल्यानंतर आम्ही तातडीने त्यांना घर दुरुस्त करून देण्याचा निर्णय घेतला. या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून, आजीला न्याय देता आल्याचे समाधान आहे. - कृष्णराज महाडिक
फोटो : १८ उजळाईवाडी घर
पावसाळ्यात घर कोसळल्याने उघड्यावर संसार थाटलेल्या मंगल कानडे यांचे घराचे स्वप्न विश्वराज व कृष्णराज महाडिक यांनी पूर्ण केले.