तुंग खुनातील फरारीस अटक

By Admin | Updated: December 17, 2014 23:59 IST2014-12-17T23:41:57+5:302014-12-17T23:59:22+5:30

पोलीस कोठडी : संशयित मुख्य आरोपीचा वडील

Fugitives arrested in Tung murder | तुंग खुनातील फरारीस अटक

तुंग खुनातील फरारीस अटक

सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आनंदा हराळे या गुंडाच्या खूनप्रकरणी फरारी असलेल्या दशरथ किसन मलमे (वय ४५, रा. तुंग) यास आज (बुधवार) सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. गेले आठ दिवस तो फरारी होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दशरथ मलमे हा खुनामधील मुख्य संशयित संपत मलमे याचा वडील आहे.
या खूनप्रकरणी यापूर्वी संपत मलमे व धनाजी ऊर्फ लक्या मलमे या चुलत भावांना अटक करण्यात आली असून, दशरथ मलमे हा संपतचा वडील असल्याचे पोलिसांनी सांगितले. आनंदा हराळे याचे संशयित संपत मलमे याची बहीण अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध होते. गतवर्षी तिचा विवाह झाला होता. त्यानंतरही या दोघांत अनैतिक संबंध सुरूच होते. तिने आनंदाकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. यातून आनंदाने डिसेंबर २०१३ मध्ये तिच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. अर्चनाचे भाऊ संपत व धनाजी त्याच्यावर चिडून होते. गुरुवारी त्यांनी आनंदाचा तुंगच्या चावडीसमोर थरारक पाठलाग करून निर्घृण खून केला होता. या खुनासाठी दशरथ मलमे याने आपल्या मुलाला प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
दशरथ मलमे यास आज येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता, त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव करीत आहेत. (प्रतिनिधी)


आठ दिवस फरारी
दशरथ मलमे हा गेले आठ दिवस फरार होता. पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. आज तो घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. खुनामध्ये त्याचा सहभाग किती आहे, याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Fugitives arrested in Tung murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.